रस्ता झाला, कचरा आला.....! कागणी कालकुंद्री रस्त्यावरील प्रकार, कारवाईची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

28 May 2024

रस्ता झाला, कचरा आला.....! कागणी कालकुंद्री रस्त्यावरील प्रकार, कारवाईची मागणी

कागणी ते कालकुंद्री रस्ता व साईड पट्ट्यांवर टाकण्यात आलेले रान व कचरा.

कुदनूर : सी एल वृत्तसेवा
   केवळ चारच दिवसांपूर्वीच तयार झालेला कागणी- राजगोळी रस्ता व बाजू पट्ट्यांवर पुन्हा दगडधोंडे, रान व कचऱ्याचा विळखा पडू लागला आहे.   शिवारातील वेचलेले दगड धोंडे, कचरा व भांगलण करून काढलेले रान रस्त्यावर टाकण्याचा सपाटा सुरू झाला आहे. रस्त्यावर असा कचरा टाकणाऱ्या तसेच रस्ता कोरणाऱ्या अपप्रवृत्तींना बांधकाम विभागाने तात्काळ दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी प्रवासी व वाहनधारकांतून होत आहे.
  गेल्या काही वर्षांत अनेक आंदोलने व मागणीनंतर कागणी, कालकुंद्री, कुदनूर, तळगुळी ते राजगोळी खुर्द रस्ता खडीकरण, बीबीएम व डांबरीकरण करून पूर्णत्वाकडे आला आहे. कागणी ते कुदनूर टप्प्यातील रस्ता पूर्ण झाला असून येथे शेतातील भांगललेले रान व कचरा थेट डांबरी रस्ता व साईड पट्ट्यांवर टाकण्यात आल्याचे दिसत आहे. यामुळे साईड पट्ट्यांची अवस्था 'येरे माझ्या मागल्या' अशी झाली आहे.  रस्त्यावरील कचरा पाहून प्रवासी व वाहनधारकांतून संताप व्यक्त होत असून अशा समाजविघातक प्रवृत्ती व संबंधित शेतकऱ्यांना ग्रामपंचायत च्या सहकार्याने शोधून त्यांना ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात यावा अशी मागणी मार्गावरील प्रवाशी, वाहनधारक व ग्रामस्थांनी केली आहे. यासाठी संबंधित हद्दीतील ग्रामपंचायत प्रशासनाने असे अतिक्रमण होणार नाही यासाठी दक्ष राहिले पाहिजे. तरच    लाखो रुपये खर्च करून तयार झालेले रस्ते व्यवस्थित राहतील अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

No comments:

Post a Comment