उचगाव येथील मळेकरणी देवस्थान मध्ये बकरी मारून यात्रा करण्यावर बंदी....! ग्रामस्थांचा क्रांतिकारी निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

27 May 2024

उचगाव येथील मळेकरणी देवस्थान मध्ये बकरी मारून यात्रा करण्यावर बंदी....! ग्रामस्थांचा क्रांतिकारी निर्णय

उचगाव येथील श्री मळेकरणी देवीचे मंदिर

कुदनूर : सी एल वृत्तसेवा 
   उचगाव, ता. जि. बेळगाव कर्नाटक येथील श्री मळेकरणी देवस्थानमध्ये यापुढे कोंबडी बकऱ्यांचा बळी देण्याच्या प्रथेला निर्बंध घालण्याचा क्रांतिकारी निर्णय उचगाव ग्रामस्थांनी घेतला आहे. संपूर्ण वर्षभर दर मंगळवार शुक्रवार असे आठवड्यातील दोन दिवस मोठ्या प्रमाणात यात्रा चालत होती. या अभूतपूर्व निर्णयामुळे हौसे, गौसे, नवसे, मद्यपी, मद्य विक्रेते, व हॉल भाड्याने देणाऱ्या घरमालकांत एकच खळबळ उडाली आहे.
  नव्या निर्णयानुसार १ जून २०२४ नंतर उचगाव आणि परिसरात कोणालाही येथे बकऱ्यांचा बळी देऊन मांसाहारी जेवणावळी, यात्रा करता येणार नाही. जर कोणी असे केल्यास त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा महत्त्वपूर्ण ठराव सोमवार दि. २७ मे २०२४ रोजी  उचगाव ग्रामपंचायत, देसाई भाऊबंद कमिटी, देवस्थान पंच कमिटी आणि ग्रामस्थांच्या झालेल्या बैठकीत बहुमताने संमत करण्यात आला आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उचगाव ग्रामपंचायत च्या अध्यक्षा मथुरा तेरसे ह्या होत्या.
उचगाव येथील गांधी चौकातील मध्यवर्ती गणेश विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये सोमवारी सकाळी उचगाव गावातील सर्व ग्रामस्थ, देसाई भाऊबंद कमिटी, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बैठक बोलावण्यात आली होती. उचगाव येथील प्रसिद्ध आणि जागृत असलेल्या मळेकरणी देवस्थानमध्ये वर्षभर मंगळवार आणि शुक्रवार बकऱ्याचा बळी देऊन जेवणावळीचे मोठे कार्यक्रम होत असत. यात्रेत भक्ती कमी आणि मौजमस्ती, मांसाहार, दारू, मटण यावरच जोर  असल्याने उचगाव ग्रामस्थांचे जिने कठीण झाले होते. देवीच्या नावाने देण्यात येणाऱ्या पशूबळी मुळे बकऱ्यांचे अवशेष रक्त , आणि इतर टाकाऊ पदार्थ यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून ग्रामस्थांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता. याबरोबरच वाहतुकीची सातत्याने होणारी कोंडी परिणामी ग्रामस्थांना तसेच उचगाव कोवाड या मार्गावरती येजा करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा नाहक त्रास मंगळवार शुक्रवार सहन करावा लागत असे.  दारू पिणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालल्याने मळेकरणी देवीच्या परिसरात जी शेतकऱ्यांची शेती आहे या शेतवडीत बियर आणि इतर बॉटल्स पिऊन दारू ढोसून त्या बाटल्या जाताना फोडून जाणाऱ्या तळीरामांच्यामुळे 'कर्तबगारिमुळे' शेतकऱ्यांना शेतात जाणे ही मुश्किल झाले होते. सायंकाळी आठ पूर्वी यात्रा संपत असली तरी रात्री उशिरापर्यंत बरेच दरोडे रस्त्याकडे ला पडलेले दिसायचे. याबरोबर होणारा केरकचरा हे सर्व काढणे शेतकऱ्यांना मुश्किल झाले होते.  भटक्या कुत्र्यांची संख्या अफाट वाढल्याने ग्रामस्थांना विशेष करून लहान मुलांना आपला जीव मुठीत घेऊन फिरण्याची वेळ आली होती. याबरोबरच याच भागात मराठी, कन्नड प्राथमिक शाळा असून या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र असून या केंद्रात अनेक येणाऱ्या रुग्णांना या  दुर्गंधीशी सामना करण्याची वेळ आली होती.  मंदिर आमराईतून कोणेवाडी, तुरमुरी येथे येजा करणाऱ्या विद्यार्थिनी तसेच शिवारात येजा करणाऱ्या शेतकरी महिलांची दारुड्यांकडून छेड काढण्याचे प्रकार सर्रास घडत होते. या सर्वाचा सारासार विचार करून सदर यात्रा बंद करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
 देवीच्या आमराईमध्ये मंदिरात येण्यासाठी कोणालाही बंदी नाही ज्या रितीरिवाज प्रमाणे ओटी भरणे, गाऱ्हाणा घालणे आदी प्रथा नेहमीप्रमाणे चालू राहतील. देवीच्या दर्शनासाठी कोणालाही बंदी नाही. जर यात्रा करायची असेल तर त्यांनी देवीचा कुंकू, फुल घेऊन बकऱ्याला लावून त्यांनी आपल्या घरी ती यात्रा करावी आणि पै पाहुण्यांना त्यांनी जेवणावळी आपल्याच परिसरात कराव्यात मात्र उचगाव अमराई ,देवीचा परिसर यामध्ये ही यात्रा करण्यावर पूर्णपणे निर्बंध लावण्यात आले आहेत.

"मंगल कार्यालयातही यात्रेवर बंदी." याचबरोबर मंगळवार, शुक्रवार उचगाव परिसरातील जी मंगल कार्यालये आहेत याही ठिकाणीही यात्रा करता येणार नाही. असा प्रयत्न कोणी केल्यास संबंधित कार्यालय मालक व भाविक दोघांवरही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असाही ठराव  करण्यात आला आहे. या बैठकीत ग्रामपंचायतचे पीडीओ शिवाजी मडीवाळ यांनी यापूर्वी देवस्थान कमिटी आणि ग्रामपंचायत यांच्यामध्ये झालेल्या पत्रव्यवहाराची संपूर्ण माहिती यावेळी दिली. बैठकीत प्रामुख्याने ग्रामपंचायत उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, पुंडलिकराव कदम पाटील, युवराज कदम, बी.एस. होनगेकर , बाळासाहेब देसाई, डॉ. प्रवीण देसाई ,संभाजी कदम, रामा कदम यांनी आपले विचार मांडले. स्वागत एन. ओ. चौगुले यांनी केले.  एल.डी चौगुले यांनी आभार मानले.

1 comment:

जोशी गुरुजी said...

क्रांतिकारी निर्णय अभिनंदन सर्व उचगावकर ग्रामस्थ

Post a Comment