दोन महिन्यातील हा तिसरा खून झाला असल्याने तुडये पंचक्रोशीत एकच खळबळ
रामलिंग अर्जुन गवस |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील तुडये येथील रामलिंग अर्जुन गवस (वय ६५, रा. तुडये) या वृद्धावर १ मे रोजी खुनी हल्ला झाला होता. गवस यांचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
संशयित आरोपी रामलिंग कल्लाप्पा पाटील (वय ३५) याला चंदगड पोलिसांनी अटक केली आहे. दोन महिन्यातील हा तिसरा खून झाला असल्याने तुडये पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे.
या संदर्भात पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, एकतर्फी प्रेम प्रकरणातून मुलीला विनाकारण त्रास देत असल्याची फिर्याद गवस यांनी वडगाव (बेळगाव-कर्नाटक) पोलिस ठाण्यात दिली होती. हा राग मनात धरून रामलिंग पाटील याने रामलिंग गवस यांना दि. १ मे रोजी त्यांच्याच घरात घुसून लाथा- बुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यानंतर गवस यांना हुबळी येथील के. आय. एम. एस. रुग्णांलयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, दि. ३ मे रोजी चंदगड पोलिस ठाण्यात रामलिंग पाटील विरोधात गुन्हा दाखल केला होता. मयत गवस व संशयीत आरोपी रामलिंग हे शेजारी शेजारी राहायला आहेत. गवस यांच्या मागे पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment