राजर्षी शाहू, स्त्री शिक्षण व बहुजन समाज उध्दारासाठी झटणारा लोकराजा...! - प्रा. सरोजिनी - चंदगड लाईव्ह न्युज

26 June 2024

राजर्षी शाहू, स्त्री शिक्षण व बहुजन समाज उध्दारासाठी झटणारा लोकराजा...! - प्रा. सरोजिनी



चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
   लोकराजा राजर्षी शाहू हे स्त्रीयांच्या शैक्षणिक व बहुजन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचे स्वप्न पाहणारा, मानवतेचा महान उपासक होते असे प्रतिपादन प्रा. सौ. सरोजिनी दिवेकर यांनी केले. त्या चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात महाराष्ट्र शासन, कोल्हापूर जिल्हाधिकारी, व शिवाजी विद्यापीठाच्या वतीने  आयोजित 'शाहूंचे विचार' या उपक्रमांतर्गत बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते.
    कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना, खेडूत प्राध्यापक प्रबोधिनी, वनसंवर्धन व वृक्ष लागवड कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. लोकराजांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा. ए डी कांबळे यांनी केले. यावेळी पुढे बोलताना प्रा दिवेकर म्हणाल्या, सामाजिक न्यायासाठी रा. शाहूंनी विविध पातळीवर कार्य केले. शेती व शेतीपूरक व्यवसायाला चालना, कुस्ती सारखे खेळ व कलेला कृतिशील प्रोत्साहन, प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. विधवा पुनर्विवाहाचा कायदा करण्याबरोबरच मानवतेच्या कल्याणासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. असे सांगून त्यांनी शाहू महाराजांच्या विविध लोकोपयोगी कार्याचा आढावा घेतला.
      अध्यक्षीय भाषणात गोरल यांनी राजर्षी शाहू महाराजांनी  समतेचा विचार देताना विविध जाती धर्मातील अनेक माणसे उभे केली. त्यांनी दिलेला आधुनिकता व पुरोगामी विचाराचा वसा आणि वारसा जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. राजर्षी शाहू शतकोत्तर जयंतीच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या परिसरात ५० जंगली वृक्षांची लागवड करून ती जगवण्याचा संकल्प करण्यात आला.
      यावेळी डॉ एम एम माने, प्रा. व्ही के गावडे आदींसह सर्व  प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा डॉ एस एन पाटील यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment