पर जिल्ह्यातून आलेल्या स्थानिक शिक्षकांवर अन्याय...! उद्धव ठाकरे शिवसेनेचा सीईओ कार्तिकेयन यांना घेराव - चंदगड लाईव्ह न्युज

26 June 2024

पर जिल्ह्यातून आलेल्या स्थानिक शिक्षकांवर अन्याय...! उद्धव ठाकरे शिवसेनेचा सीईओ कार्तिकेयन यांना घेरावकोल्हापूर : सी. एल. वृत्तसेवा 
       गेल्या दीड दोन महिन्यापासून महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची ऑनलाइन प्रक्रिया सुरू आहे. यातून कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यातील स्थानिक शिक्षक जे गेल्या अनेक वर्षांपासून सातारा, सांगली, रायगड, पुणे आदी जिल्ह्यांत कार्यरत होते, ते आंतर जिल्हा बदलीने महिनाभरापूर्वी पासून कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे हजर झाले आहेत. त्यांना जिल्हा अंतर्गत झालेल्या बदल्यांपूर्वी त्यांच्या स्व तालुक्यात पदस्थापना देणे अपेक्षित होते. स्वतःच्या घरापासून सुमारे २०-२० वर्षे पर जिल्ह्यातील दुर्गम भागात नोकरी केल्यानंतर आपल्या स्वतःच्या तालुक्यात गावापासून जवळपास शाळा मिळेल या अपेक्षेने आलेल्या शिक्षकांचा बदल्यांच्या घोळात भ्रमनिरास झाला आहे. या शिक्षकांना नेमणूक देण्यापूर्वी जिल्हा अंतर्गत बदल्या केल्याने सर्व जागा भरल्या गेल्या. गावापासून जवळपास जागाच रिक्त नाहीत. यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला असून बाहेरून आलेल्या अशा शिक्षकांची 'आगीतून फुफाट्यात' अशी अवस्था झाली आहे.
      या सर्वांची माहिती मिळताच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिप. कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांची भेट घेऊन झाल्या प्रकाराबद्दल चर्चा केली. 'या' शिक्षकांची गैरसोय न होता सोयीच्या शाळा मिळाव्यात यासाठी आग्रह धरला. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी कोणता तोडगा काढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 
     यावेळी उद्धव ठाकरे शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे, उप जिल्हा प्रमुख बाजीराव पाटील, संभाजी पाटील, चंदगड विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू रेडेकर, आजरा तालुका प्रमुख युवराज पवार, गडहिंग्लज तालुका प्रमुख अजित खोत, युवा सेना जिल्हा प्रमुख अवधूत पाटील व शिवसैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment