कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
किणी (ता. चंदगड) येथील कै. सौ. प्रमिला मारुती कुट्रे यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त कुट्रे कुटुंबीय इतर पारंपारिक कर्मकांडाला फाटा देत परिवर्तनवादी विचारसरणीतून दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असते. यावर्षी कै. प्रमिला यांच्या स्मृतिदिनानिमित्त कुट्रे कुटुंबीयांनी कडलगे खुर्द येथील ग्रामपंचायतला वृक्ष रोपांची भेट देऊन आपले समाजाभिमुख कार्य सुरू ठेवले.
किणी येथील रहिवासी व मामासाहेब लाड विद्यालय ढोलगरवाडीचे माजी मुख्याध्यापक एम. एम. कुट्रे सहकुटुंब कडलगे खुर्द येथे २५ वर्षे राहिले. दरम्यान या गावाशी त्यांचे कुटुंब एकरूप झाले होते. त्यांच्या पत्नी सौ प्रमिला उर्फ शांता सर्वांशी आपुलकीने वागत, लहान थोरांची अगत्यपूर्वक विचारपूस करायच्या. त्या कडलगे वासियांत "शांता आऊ" म्हणून ओळखल्या जात. त्यांच्या निधन प्रसंगी कडलगे गावही हळहळला होता. त्यांच्या पुणे स्थित कन्या सौ. गीता संदीप निकम यांचा जन्म कडलगे खुर्द गावीच झाला होता. म्हणून त्यांनी आपल्या मातोश्रींच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त तेथील वैकुंठभूमीच्या सुशोभीकरणासाठी विविध प्रकारची वृक्ष रोपे दान केली. कुट्रे कुटुंबियांच्या वतीने सर्व रोपे चंदगड पत्रकार संघाचे सदस्य संजय मारूती कुट्रे यांनी सरपंच किरण पाटील, उपसरपंच गणपती तुळसकर यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी अरुण पाटील, सदस्या कविता पाटील, सरिता पाटील, वंदना पाटील व शोभा पाटील, राजू पाटील (पोलीस पाटील), वसंत पाटील, सागर पाटील, उमेश कांबळे, हर्ष कुट्रे, रामू पाटील, विलास पाटील, प्रवीण कोले व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment