पारगड हेरिटेज रन मॅरेथॉन स्पर्धेचे निमंत्रण न्यायाधीश चारुदत्त शिपकुले यांना देताना प्रवीण चिरमुरे व चंदगड पत्रकार संघाचे पदाधिकारी |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
'एक धाव निसर्गासाठी' हे ब्रीदवाक्य घेऊन ऐतिहासिक किल्ले पारगड वर दरवर्षी होणारी 'पारगड हेरिटेज रन' आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅरेथॉन स्पर्धा यंदा ९ जून रोजी होत आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून निसर्ग पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर निसर्ग संवर्धन व लोक प्रबोधनासाठी या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा या स्पर्धेच्या सर्व विभागात मिळून विक्रमी ६०० स्पर्धक सहभागी होणार आहेत.
पारगड हेरिटेज रन मॅरेथॉन स्पर्धेचे निमंत्रण पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांना देताना स्पर्धाप्रमुख गिर्यारोहक प्रवीण चिरमुरे सोबत चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी |
किल्ले पारगड जनकल्याण संस्था मुंबई, स्टॉफ इंडिया, ग्रुप ग्रामपंचायत मिरवेल, ऑल्टिट्यूड क्वेस्ट ॲडव्हेंचर एलएलपी, आउट प्ले स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ९ जून २०२४ रोजी होणाऱ्या स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्टॉफ इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन चिरमुरे व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते, पारगड जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष कान्होबा माळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. स्पर्धेचा प्रारंभ व शेवट किल्ल्यावरील भवानी मंदिर येथून होणार आहे.
टी-शर्ट चे वाटप सकाळी ५ वाजता होईल. पुरुष व महिला गटातील ‘जंगल हाफ मॅरेथॉन’ २१ किमी सकाळी ७ वाजता, ‘जंगल ड्रीम रन’ १० किमी ७.३० वाजता तर ‘जॉय ऑफ जंगल’ ५ किमी शर्यत ८ वाजता सुटेल. स्पर्धेतील सहा गटातील अनुक्रमे तीन विजेत्यांना रोख बक्षिसे तर सहभागी सर्व स्पर्धकांना टी-शर्ट, प्रशस्तीपत्र, पदक व फळ झाडाचे रोपटे दिले जाणार आहे. ८ रोजी मुक्कामी येणाऱ्या स्पर्धकांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था किल्ल्यावर करण्यात आली आहे.
स्पर्धेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे- ९ जून सकाळी ५ वाजता स्पर्धकांचे आगमन, कार्यक्रमाची संक्षिप्त माहिती व नाष्टा, ६ ते ७ उद्घाटन व स्पर्धा प्रारंभ, ९ ते ११ पारितोषिक वितरण, निसर्ग संवर्धन विषयी मार्गदर्शन व परिसरात वृक्षारोपण होणार आहे. यावेळी तहसीलदार राजेश चव्हाण, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, रेंजर नंदकुमार भोसले, आरोग्य अधिकारी बी डी सोमजाळ आदींसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, क्रीडा क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. स्पर्धा मार्गावर ड्रोन कॅमेरे, ठिकठिकाणी रेस मार्शलच्या नजरेखालील चेक पॉईंट, रुग्णवाहिका, वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाणी, केळी, ग्लुकोज आदी सुविधा उपलब्ध असतील.
यंदाच्या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्य व देशाच्या कानाकोपऱ्यातून ५०३ स्पर्धकांनी ऑनलाईन नोंदणी केली असून स्पर्धेच्या दिवसापर्यंत ही संख्या ६०० पार होईल अशी माहिती देताना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवेश विनामूल्य असून ऑनलाइन नोंदणी व अधिक माहितीसाठी www.pargad.in या वेबसाईटला भेट द्यावी. असे आवाहन संयोजकांच्या वतीने स्पर्धा प्रमुख प्रवीण चिरमुरे यांनी दिली.
No comments:
Post a Comment