अभूतपूर्व उत्साहात पारगड वर शिवराज्याभिषेक सोहळा, गोंधळ, पोवाडे, रणहलगी व युद्धकला प्रात्यक्षिकांनी वातावरणात चैतन्य - चंदगड लाईव्ह न्युज

08 June 2024

अभूतपूर्व उत्साहात पारगड वर शिवराज्याभिषेक सोहळा, गोंधळ, पोवाडे, रणहलगी व युद्धकला प्रात्यक्षिकांनी वातावरणात चैतन्य

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पारगड किल्ल्यावर ध्वजारोहण करताना आमदार राजेश पाटील गोपाळराव पाटील व शिवभक्त
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 
      छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अजिंक्य किल्ले परगडावर ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला. मजरे कार्वे (ता. चंदगड) येथील शहीद जवान वेल्फेअर फाउंडेशन, शिवनेरी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व पारगड ग्रामस्थांच्या वतीने  रायगडावरील राज्याभिषेक सोहळ्याच्या धरतीवर ८ वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

        ६ जून २०२४ रोजी पहाटे काकडा आरती. ८ वाजता हनुमान मंदिर नजीक आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते गोपाळराव पाटील यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण, शस्त्रास्त्र पूजन व भंडारा उधळण करण्यात आली. यावेळी गड पायथा ते भवानी मंदिर पर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. या दरम्यान सदरेवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले. यावेळी वळीवडे येथील दिगंबर खांडेकर आखाडा पथकाने लेझीम, मर्दानी खेळ व चित्तथरारक युद्ध कला प्रात्यक्षिके सादर केली. 

   भवानी मंदिर समोरील मुख्य राज्याभिषेक सोहळा प्रसंगी शिवचरित्र अभ्यासक पराग निट्टूरकर यांनी छ. संभाजी महाराज लिखित बुद्धभूषण या ग्रंथातील संस्कृत भाषेतील शिवराज्याभिषेक वर्णनाच्या ओव्यांचे संदर्भ व अर्थासह स्पष्टीकरण देत राज्याभिषेकाचे महत्त्व विशद केले. यावेळी माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील, नंदाताई बाभुळकर, कार्वे चे सरपंच शिवाजी तुपारे, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 

   तत्पूर्वी दि. ५ रोजी कार्व येथून शिव पालखीचे गडावर आगमन झाल्यानंतर गड स्वच्छता, गड पूजन करण्यात आले. सायंकाळी संगीतकार अभिजीत पाटणे व सहकाऱ्यांच्या गीत बहार कार्यक्रमाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी हत्ती मित्र आनंद शिंदे यांनी हत्ती व इतर वन्य प्राण्यांशी आपण मैत्री करण्याची वेळ आल्याचे मत व्यक्त केले. रात्री मान्सूनच्या रिमझिम पावसात शाहीर रंगराव पाटील व पथकाने शाहिरी साज चढवला त्यांच्या पोवाड्यानी गडावर शिव चैतन्य निर्माण केले. रात्री भवानी मंदिरासमोर देवीचा गोंधळ मांडण्यात आला. यावेळी हलगी सम्राट संजय बापू आवळे व पथकाच्या हलगी व भूमकिच्या ठेक्यावर शेकडो शिवभक्तांनी दिवट्या नाचवत उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी पावसाळी धुक्याने व्यापलेल्या आसमंतात रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. 

    दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमात देवापा बोकडे, विष्णू गावडे, शिवाजी सावंत, अशोक कदम, चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्यासह चंदगड, आजरा, गडहिंग्लज, बेळगाव  सीमाभाग व तळ कोकणातून प्रचंड संख्येने शिवभक्त तसेच सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.


 पाण्याचे दुर्भिक्ष, शिवभक्तांचे हाल
    चंदगड तालुक्यातील एक प्रमुख धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटन केंद्र म्हणून किल्ले पारगडकडे पाहिले जाते. तथापि येथे येणाऱ्या पर्यटक, शिवभक्त व ग्रामस्थांसमोर अनेक समस्यांचा डोंगर उभा आहे. गेली अनेक वर्षे मागणी असूनही येथे अद्याप पाण्याची सोय नाही. उन्हाळ्यातील तीन महिने गडावर पाण्याचे दुर्भिक्ष असते. राज्याभिषेकसाठी आलेल्या शिवभक्तांनाही याचा फटका बसला. 
 
शासकीय पातळीवर उदासीनता 
     ८ वर्षांपासून सुरू असलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबत तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालये उदासीन आहेत. गडावर दाखल शिवभक्तांची दखल शासकीय पातळीवर कुठेही घेतलेली दिसत नाही. केवळ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह कार्यक्रम स्थळी उपस्थित होते. काही वर्षांपासून गड ताब्यात घेतलेल्या वन विभागाचेही गडावरील अंतर्गत रस्ते व सोयी सुविधांबाबत दुर्लक्षच आहे.

No comments:

Post a Comment