स्पर्धेचे उद्घाटन उद्घाटन करताना आमदार राजेश पाटील, बिपिन चिरमुरे, कान्होबा माळवे आदी |
संपत पाटील, चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
'एक धाव निसर्गासाठी'' हे ब्रीदवाक्य घेऊन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दरवर्षी घेण्यात येणाऱ्या 'पारगड हेरिटेज रन' मॅरेथॉन स्पर्धा ९ जून २०२४ रोजी अभूतपूर्व उत्साहात पार पडल्या. स्पर्धेच्या विविध सहा गटांत यंदा महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील तब्बल ६०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. जंगल हाफ मॅरेथॉन, २१ किमी स्पर्धेच्या पुरुष विभागात रोहित मिश्रा (कराड) तर महिला गटात भक्ती सुनील पोटे गडहिंग्लज यांनी विजेतेपद पटकावले.
सहप्रयोजक चंदगड पत्रकार संघ यांच्या वतीने सत्कार स्वीकारताना अध्यक्ष श्रीकांत पाटील व पत्रकार |
आउट प्ले स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित स्पर्धेचे मुख्य प्रयोजक स्टॉफ इंडिया तर अल्टीट्यूड क्वेस्ट, फिट इंडिया, वन विभाग, पारगड जनकल्याण संस्था मुंबई, ग्रुप ग्रामपंचायत मिरवेल, चंदगड तालुका पत्रकार संघ हे सहप्रयोजक होते. स्पर्धेचे उद्घाटन चंदगडचे आमदार राजेश पाटील, स्टॉफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन चिरमुरे, अध्यक्ष उद्योजक कान्होबा माळवे यांच्या हस्ते झाले.
१० किमी जंगल ड्रीम रन स्पर्धेतील विजेते |
सह्याद्री डोंगर रांगांच्या कुशीत वसलेल्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पारगड किल्ल्यावरून मान्सूनच्या पहिल्या जलधारा अंगावर झेलत ६ वर्षांच्या बालकापासून ७५ वर्षे वयाच्या वृद्ध स्पर्धकांनी डोंगरदऱ्यातून धावण्याचा थरार अनुभवला. ऑलिंपिक स्पर्धेच्या धर्तीवर घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेच्या तीन प्रकारातील पुरुष व महिला अशा सहा गटातील विजेते अनुक्रमे पुढील प्रमाणे. 'जंगल हाफ मॅरेथॉन' २१ किमी पुरुष- रोहित मिश्रा (कराड), शुभम पाटील (हालेवाडी, ता. आजरा), देवबा देसाई (देगवे, ता. सावंतवाडी) महिला गट भक्ती सुनील पोटे (गडहिंग्लज) या एकाच महिलेने २१ किमी अंतर पार करून प्रथम क्रमांक पटकावला. 'जंगल ड्रीम रन' १० किमी, पुरुष- पृथ्वीराज रमेश कांबळे (महागाव), शिवराज भैरू घोलराखे (भडगाव- गडहिंग्लज), सुरज वैभव कांबळे (जंगमहट्टी, ता. चंदगड). महिला गट वंदना विठ्ठल गोरुले (महागाव), जान्हवी पांडुरंग मोहनगेकर (किणी, ता. चंदगड), क्रांती सोमनाथ वेताळ (कल्लेहोळ, बेळगाव). जॉय ऑफ जंगल ५ किमी विजेते पुरुष गट बाबू शिवाजी गावडे (सोनारवाडी), सुरज परमेश्वर भालेकर (लातूर), शिवम नारायण कोपर्डे (बेळगाव). महिला गट वेदांती बाळाराम मणगुतकर (किणी), सुरभी शिवाजी चव्हाण (विंझणे), सांभवी शांताराम जाधव (विंझणे, ता. चंदगड) यांनी विजेतेपद व रोख बक्षीसे जिंकली. याशिवाय ५ किमी सब ज्युनिअर गटात अनुक्रमे तुषार पडवळे (विंझणे), जय पांडुरंग मोहनगेकर (किणी), आयुष कंग्राळकर (बेळगाव) तर मुलींमध्ये भक्ती कलाप्पा गुरव (जुने बेळगाव) आराध्या भरमाणा हलगेकर (यळ्ळूर) अक्षता सदानंद हलगेकर (यळ्ळूर) यांनी विजेतेपद पटकावले.
सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक टी-शर्ट, प्रशस्तीपत्र, ब्रांझ पथक व फळ झाडाचे रोपटे देण्यात आले.
आमदार राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे स्वागत शांताराम आडाव, नारायण गडकरी, प्रकाश चिरमुरे यांनी केले. प्रस्ताविक स्पर्धा प्रमुख प्रवीण चिरमुरे यांनी केले. यावेळी स्टॉफ इंडियाचे सीईओ बिपिन चिरमुरे, उद्योजक कान्होबा माळवे यांची भाषणे झाली. यावेळी सुनील मालुसरे, रघुवीर शेलार, विठ्ठल शिंदे, क्रीडा प्रशिक्षक पी जे मोहनगेकर, सरपंच तुकाराम सुतार, वन विभागाने कर्मचारी आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, क्रीडा प्रेमी व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीकांत पाटील यांनी केले.
५ किमी जॉय ऑफ जंगल स्पर्धेत सहभागी ६ ते ७५ वर्षे वयाचे स्पर्धक |
मुसळधार पावसामुळे गैरसोय व आनंदही
स्पर्धेत एकूण सहाशे पेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतला. यापैकी लांबून येणारे स्पर्धक आदल्या दिवशी म्हणजे ८ जून २०२४ रोजी गडावर दाखल झाले होते. तथापि याच दिवशी सकाळपासून सुरू झालेल्या मान्सूनच्या जोरदार पावसामुळे स्पर्धकांच्या राहण्याची ठिकाणी भिजल्याने काही प्रमाणात गैरसोय झाली. तरीही पारगड वरील पावसाळा कसा असतो हे पाहता आल्याने धावपटूंचा उत्साह अधिकच वाढला होता. अशा पावसातच धावण्याचा आनंद स्पर्धकांनी मनापासून लुटला.
उत्कृष्ट नियोजन
ऑलिंपिक दर्जाच्या या स्पर्धेचे आयोजन व नियोजन आउट प्ले स्पोर्ट्स फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले होते. संस्थेचे मुंबई, पुणे व कोकण विभागातील सदस्य या ठिकाणी तळ ठोकून होते. त्यांना पारगड ग्रामस्थांनी उत्कृष्ट सहकार्य केले. आलेल्या सर्व स्पर्धक, क्रीडाप्रेमी नागरिक व विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसह आल्यापासून दोन दिवस सर्वांना नाष्टा, जेवण, चहापाणी याची कोणतीच कमतरता भासू दिली नाही. चंदगड नगरपंचायतीने सुद्धा फिरते शौचालय देऊन आपला वाटा उचलला. तथापि तालुक्यातील इतर शासकीय विभागांची स्पर्धेबाबत उदासीनता क्रीडा रसिकांच्या नाराजीचा विषय बनली होती.
No comments:
Post a Comment