कालकुंद्रीत भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी, परगावच्या भाविकांची विठुरायाच्या दर्शनासाठी उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

18 July 2024

कालकुंद्रीत भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी, परगावच्या भाविकांची विठुरायाच्या दर्शनासाठी उपस्थिती

 


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
  कालकुंद्री (ता. चंदगड) येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. यंदा नवीनच उभारण्यात आलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चंदगड तालुक्यातील विविध गावच्या भाविकांनी उपस्थित राहून विठू माऊली चे दर्शन घेतले. आषाढी एकादशी निमित्त मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजता गावातून उत्साही वातावरणात वारकरी दिंडी काढण्यात आली. यात गावातील आबाल वृद्ध, महिला, शालेय विद्यार्थी, शिक्षक व वारकरी टाळ मृदंग, तुलसी वृंदावन, भगव्या पताकांसह सहभागी झाले होते.
  सकाळी विठ्ठल रुक्मिणी मूर्तीला अभिषेक घालून पूजा करण्यात आली. आषाढी एकादशी पारण्यानिमित्त ग्रामस्थांनी उपवास पाळला होता. मंदिराच्या उद्घाटनापासून चंदगड तालुका व सीमाभागातील विविध गावचे ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य नाही असे वारकरी व भाविक विठू माऊली दर्शनासाठी कालकुंद्री येथे येताना दिसत आहेत. आजही अशा भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. त्यांची कालकुंद्री  ग्रामस्थांच्या वतीने उपवासाची खिचडी देऊन सोय करण्यात आली होती.  रात्री उशिरापर्यंत मंदिरात गाव व परिसरातील दिंड्यांची भजन सेवा सुरू होती. 

No comments:

Post a Comment