चंदगड तालुक्यातील जास्तीत जास्त लोककलाकारांना मानधन मिळावे....!संघटनेची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

22 July 2024

चंदगड तालुक्यातील जास्तीत जास्त लोककलाकारांना मानधन मिळावे....!संघटनेची मागणी



चंदगड : सी एल वृत्तसेवा 
      चंदगड तालुका हा कलाकारांची खाण आहे. येथे अनेक वृद्ध कलाकार मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या अन्य तालुक्यातून मानधनासाठी जितक्या कलाकारांची निवड केली जाते त्या तुलनेत चंदगड मधून निवडल्या जाणाऱ्या कलाकारांची संख्या नगण्य असल्याची खंत माणगाव, ता. चंदगड येथे नुकत्याच झालेल्या लोक कलाकार संघाच्या बैठकीत व्यक्त व्यक्त करण्यात आली.
   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे तालुकाध्यक्ष रघुनाथ कांबळे होते. स्वागत रामदास बागडी यांनी केले. विजयकुमार कांबळे यांनी प्रास्ताविक केले. चंदगड तालुक्यात संगीत भजन, सोंगी भजन, किर्तन, नाटक, शाहिरी पोवाडे, युद्ध कला, मर्दानी खेळ, गोंधळ गीते, भारुड, संगीत नाटक, रंगभूमी, सिने कलाकार, साहित्यिक आदी विविध क्षेत्रातील कलाकारांची संख्या मोठी आहे. तथापि शासनाच्या विविध योजना पासून ते वंचित आहेत. अशा कलाकारांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, शासनाकडून कलाकार ओळखपत्र मिळावे, १५ वर्षांपूर्वीचा पुरावा अट रद्द करावी, तालुक्यातून १०० ऐवजी ५०० कलाकारांची निवड व्हावी, कलाकार व वारसांना मिळणारे मानधन दरमहा मिळावे. आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी जिप. चे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अमन मित्तल यांचे सहकार्य तसेच महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कलाकार मानधन सरसकट ५ हजार मंजूर केल्याबद्दल त्यांचे व शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.
   यावेळी चंदगड पंचायत समितीचे समाजकल्याण विभागाचे एम वाय नाईक, मारुती पाटील (मुगळी), नामदेव पाटील (हल्लारवाडी), विष्णू गोंधळी (हुंबरवाडी), सुरेश सुतार (नागरदळे), अरुण वाजंत्री (देवरवाडी), आप्पाजी चव्हाण, अनिता भोगण, शकुंतला लोहार, अलका कांबळे, शुभांगी कांबळे आदीसह लोककलाकार संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सातेरी बसरीकट्टी यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment