अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील घरे व गोठ्यांचे तात्काळ पंचनामे करा-- उबाठा शिवसेनेची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

22 July 2024

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील घरे व गोठ्यांचे तात्काळ पंचनामे करा-- उबाठा शिवसेनेची मागणी



चंदगड / प्रतिनिधी

    चंदगड व गडहिंग्लज तालुक्यात पावसामुळे पडझड झालेल्या घरांचे व गोठ्यांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी (उबाठा) शिवसेनेच्या वतीने केली आहे.याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने याना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.            

    चंदगड व गडहिंग्लज तालुक्यामध्ये जोरदार पावसाने अनेक घरांची व गोठ्यांची पडझड झाली आहे. चंदगड तालुक्यात ३२  व गडहिंग्लज तालुक्यात २३ घरांचा यामध्ये समावेश आहे. पडझड झाल्याने  मोठ्या प्रमाणात या घरांचे नुकसान झाले आहे. यामुळे अनेक कुटुंबांचे हाल होत आहेत. त्यांचा संसारच उघड्यावर पडल्याने खाण्यापिण्याचा प्रश्न उद्भवला आहे. तसेच या घरातील जनावरांच्या चाऱ्याचीही गैरसोय होत आहे. या नुकसानग्रस्त लोकांना तातडीने शासकीय जागेत स्थलांतरित करून त्यांना निवारा उपलब्ध करून द्यावा, त्यांच्या राहण्याची व जेवणाची तसेच जनावरांच्या चारा- पाण्याची सोय करावी, पडझड झालेल्या घरांचे तात्काळ पंचनामे करावेत व शासनाकडून त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, संसारोपयोगी साहित्य त्यांना उपलब्ध करून देण्यात यावे आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. 

       निवेदनावर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, चंदगड विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू रेडेकर, तालुकाप्रमुख दिलीप माने, अजित खोत, आजरा तालुका प्रमुख युवराज पोवार, जिल्हा युवासेना अधिकारी अवधूत पाटील, शहर प्रमुख संतोष चिकोडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment