कागणी शिवारात वन्यप्राण्यांनी मोडून व खाऊन केलेले ऊस पिकाचे नुकसान. |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कागणी (ता. चंदगड) हद्दीतील शिवारात वन्यप्राणी प्राण्यांचा धुडगूस सुरू आहे. रानडुकरे, कोल्हे आदी प्राण्यांकडून ऊस पिकाचे मोठे नुकसान होत असून वनविभागाने त्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
चंदगड तालुक्याच्या पश्चिमेकडील जंगल भागाच्या जवळपास असलेल्या शेतीचे रानडुक्कर गावे अशा प्राण्याकडे नुकसान झाल्याच्या बातम्या नित्याच्याच बनल्या असताना वन्य प्राण्यांनी आपला मोर्चा तालुक्याच्या पूर्व भागाकडे वळवण्याचे चित्र दिसत आहे. पूर्वेकडील कर्नाटक हद्दी जवळच्या वैजनाथ डोंगर रांगां नजिकच्या मांडेदुर्ग, सुंडी, करेकुंडी, कौलगे, बुक्कीहाळ तर तेऊरवाडी जंगल परिसरातील शिवारात गवे, रानडुक्कर, कोल्हे, मोर अशा जंगली पशु पक्षांकडून शेती पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते. त्यात आता कागणी शिवारातील पिकांची भर पडली आहे.
गेल्या काही दिवसात रानडुकरांचे कळप व कोल्ह्या सारख्या वन्यप्राण्यांनी उभ्या ऊस व अन्य पिकांचे नुकसान सुरू केले आहे. कल्याणपूर दुर्गाडी टेकडीच्या पायथ्याशी वारी नावाच्या शेतातील पुरुषोत्तम सुळेगावकर, वसंत भोगण, नरसिंग बाचुळकर आदी शेतकऱ्यांच्या उभ्या उसाचे या जंगली प्राण्यांनी मोडून किंवा उसाची उघडी पेरे चाऊन मोठे नुकसान केले आहे. उग्र वासासाठी थिमेटच्या पुरचुंड्या व प्लॅस्टिक पट्ट्या बांधूनही प्राणी दाद देत नाहीत.
सध्या वन्य प्राण्यांच्या शिकारीस बंदी असल्याने त्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. त्याचा फटका मात्र कष्टकरी शेतकऱ्यांना बसत आहे. काबाड कष्ट करून, हजारो रुपये रुपयांची खते घालून तयार केलेली पिके अशी हाकनाक वाया जात असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. या वन्य प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी पुरुषोत्तम सुळेगावकर व शेतकऱ्यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment