![]() |
मयत वारकरी मष्णू नागोजी मोदगेकर |
कुदनूर : सी एल वृत्तसेवा
पंढरपूर येथील आषाढी एकादशी वारीतून परतल्यानंतर किटवाड (ता. चंदगड) येथील १० ते १२ वारकऱ्यांना अचानक जुलाबाचा त्रास होऊ लागला. यातील एका वारकऱ्याचा बेळगाव येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर अन्य सहा जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे वारकरी संप्रदायात एकच खळबळ उडाली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्त किटवाड येथील वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरला गेले होते. यात्रा संपवून सर्वजण दि. १८ रोजी गावी पोहोचले. त्यानंतर ७-८ तासांनी दोन ग्रुप पैकी या ग्रुप मधून गेलेल्या १०-१२ जणांना जुलाब चालू झाले. यामधे पुरुष, महिला व मुलांचाही समावेश आहे.
गावात प्राथमिक उपचार करून आजार आटोक्यात न आल्याने सर्व रुग्णांना बेळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सर्वांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले तथापि उपचार सुरू असतानाच मष्णू नागोजी मोदगेकर (वय ४०) यांचे आज दि २१ रोजी सकाळी निधन झाले. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
इतर वारकरी भाविकांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात येत आहे. या वारकऱ्यांनी वाटेत नाश्ता जेवण वगैरे काहीतरी खाल्ले होते. त्याचा परिणाम काही तासानंतर सुरू झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment