कोवाड स्टॅन्ड रस्त्याचे काम रखडले, व्यापारी, नागरिकांचे हाल, कोवाड- बेळगाव वाहतूक बंद पडण्याची शक्यता - चंदगड लाईव्ह न्युज

21 July 2024

कोवाड स्टॅन्ड रस्त्याचे काम रखडले, व्यापारी, नागरिकांचे हाल, कोवाड- बेळगाव वाहतूक बंद पडण्याची शक्यता

कोवाड स्टॅन्ड ते किणी फाटा रस्त्याची झालेली दयनीय अवस्था
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
        कोवाड (ता. चंदगड) येथील ताम्रपर्णी नदी पलीकडील स्टॅन्ड ते किणी फाटा रस्त्याचे काम रखडल्याने व्यापारी प्रवासी व नागरिकांचे हाल होत आहेत. किमान जून महिना अखेरीस हे काम पूर्ण होणे गरजेचे असताना ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे रखडले आहे. यामुळे दोन्ही बाजूला बांधलेल्या आरसीसी गटर दरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. परिणामी यातून वाहने चालवणे अवघड झाले असून कोवाड- बेळगाव मार्गावरील वाहतूक बंद पडण्याची ची शक्यता निर्माण झाली आहे.
   कोवाड स्टॅन्ड ते किणी फाटा या ५६ फूट रुंद व तीनशे मीटर लांबीच्या रस्त्याचे काम मे महिन्यात सुरू करण्यात आले होते. यावेळी दोन्ही बाजूंच्या आरसीसी गटारींचे काम करण्यात आले. सुरुवातीस युद्ध पातळीवर सुरू असलेले काम हळूहळू रखडले कसेबसे गटारीचे काम पूर्ण झाले असून नियोजित सिमेंट काँक्रीटच्या रस्ता कामाच्या कोणत्याच हालचाली गेल्या महिनाभरात दिसत नाहीत. दोन्ही बाजूच्या गटारांची उंची मधल्या रस्त्यापेक्षा दोन ते अडीच फूट अधिक असून पाऊस व पुराने साठणाऱ्या पाण्याला बाहेर जाण्यासाठी वाट न मिळाल्याने या भागाला १७ बाय २०० मीटर लांबीच्या हौदाची अवस्था प्राप्त झाली आहे. दुचाकी व छोटी चार चाकी वाहने या पाण्यातून चालवणे धोक्याचे बनले असून येथे पुराचे पाणी साठल्यास गडहिंग्लज, आजरा, नेसरी, कोवाड मार्गे बेळगाव कडे होणारी वाहतूक ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे. कॉंक्रिटीकरण होणाऱ्या या रस्त्यात मोठ्या पावसापूर्वी किमान दगड व मुरमाचा भराव टाकून उंची वाढवणे  अपेक्षित असताना याच्या कोणत्याही हालचाली दृष्टिपथात नाहीत. ठीकठिकाणी साठलेले पाणी, चिखल, दलदल यामुळे रस्त्यावर ग्राहक थांबू शकत नसल्याने येथील विविध प्रकारच्या सुमारे ५०-६० व्यावसायिकांची दुकाने एप्रिल महिन्यापासून ओस पडली आहेत. बँकांची कर्जे घेऊन सुरू केलेल्या या व्यवसायिकांचा एक सीजन वाया गेल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.
  दुसरीकडे बांधण्यात आलेली ही उंच गटारे पाणी अडवण्यासाठी बांधल्या जाणाऱ्या कट्ट्याची भूमिका बजावत असल्याने पश्चिमेकडून येणारे ताम्रपर्णी नदीच्या पुराचे पाणी अडवले जात आहे. पूर्वी रिकामी भागातून पुढे वाहणारे हे पाणी आता अडवले गेले असून हे पाणी थेट पश्चिमेकडील दुकाने व घरामध्ये घुसून इमारती कमकुवत होण्याबरोबरच नुकसानीस कारणीभूत ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे रस्ता तात्काळ पूर्ण करण्याबरोबरच पाण्याचा निचरा होण्याच्या उपाययोजना किणी ग्रामपंचायत व संबंधित विभागाने तातडीने कराव्यात अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment