बंदी आदेश झुगारून दुंडगे बंधाऱ्यावरून वाहतूक पुन्हा सुरू....!, बंदी आदेशाबाबत ग्रामस्थांतून संमिश्र प्रतिक्रिया - चंदगड लाईव्ह न्युज

02 July 2024

बंदी आदेश झुगारून दुंडगे बंधाऱ्यावरून वाहतूक पुन्हा सुरू....!, बंदी आदेशाबाबत ग्रामस्थांतून संमिश्र प्रतिक्रिया

 

दुंडगे  बंधाऱ्यावर टाकण्यात आलेले अडथळे नदीत फेकून राजरोस सुरू झालेली वाहतूक.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        १०-१५ वर्षांपासून दुरुस्ती व रुंदीकरणाची मागणी असलेल्या कुदनूर ते दुंडगे (ता चंदगड) दरम्यानच्या बंधाऱ्यावरून चालणारी सर्व प्रकारची वाहतूक बंधारा कमकुवत झाल्याच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून १ जुलै पासून बंद करण्यात आली होती. तथापि आज दि २ जुलै रोजी सकाळ पासूनच बंधाऱ्यावरील लावण्यात आलेले अडथळे नदीत फेकून वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. वाहतूक बंदी आदेशामुळे मात्र परिसरातील ग्रामस्थ व वाहनधारकांतून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

      ताम्रपर्णी नदीवरील कोवाड व कामेवाडी या दोन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांदरम्यान १५ किलोमीटर पेक्षा अधिक अंतरात दुसरा बंधारा नसल्यामुळे शेती पाणी पुरवठ्यासाठी ३० वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागामार्फत तत्कालीन आमदार नरसिंग गुरुनाथ पाटील यांच्या पाठपुराव्यातून दुंडगे येथे ताम्रपर्णी नदीवर बंधारा बांधण्यात आला. बंधाऱ्याच्या कमी रुंदीवरून कुदनूर गावचे तत्कालीन सरपंच जोतिबा खवणेवाडकर यांनी कुदनूर ग्रामस्थांसह भूमिपूजन समारंभ स्थळी उग्र आंदोलन केले होते.  हा बंधारा किमान १०-१२ फुट रुंदीचा करावा अशी त्यांची मागणी होती. त्यावेळी विविध कारणांनी या बंधाऱ्याचे बांधकाम ४-५ वर्षे अर्धवट अवस्थेत रखडले होते. शेवटी आंदोलकांना दाद न देता संबंधित विभागाने कमी रुंदीचा हा बंधारा जबरदस्तीने पूर्ण केला. 

      पण बांधल्यापासूनच गळती व अन्य कारणास्तव बंधाऱ्यात पाण्याची साठवण कधीच झाली नाही. त्यामुळे बंधाऱ्याची अवस्था ना वाहतुकीसाठी ना पाण्यासाठी अशीच होती. बंधाऱ्यावरून फक्त दुचाकी व छोटी चार चाकी वाहने नेण्याची परवानगी असताना धोकादायकरिता ऊस भरलेल्या ट्रक व ट्रॅक्टर सारख्या मोठ्या वाहनांचीही वाहतूक सुरू झाल्याने बंधारा दिवसेंदिवस कमकुवत होत गेला. गेल्या काही वर्षात नदीपात्रात ट्रॅक्टर, दुचाकी अशी वाहने पडून किमान पाच सहा जणांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव बंधाऱ्याच्या एका बाजूस लोखंडी पाईपचे रेलिंग उभारले आहे.

   दरम्यान कृष्णा खोरे योजनेतून २५ वर्षांपूर्वी शिवसेना भाजप युती शासन काळात कुदनूर, कालकुंद्री परिसरात ५ व निट्टूर, मलतवाडी नजीक ३ लघु पाटबंधारे तलाव निर्माण झाल्याने ताम्रपर्णी नदीतून बारमाही पाणी वाहू लागले परिणामी दुंडगे बंधाऱ्यात पाणी अडवण्याची गरजच संपली. तशी गेल्या काही  वर्षांत कुदनूर, तळगुळी, राजगोळी बुद्रुक व खुर्द, दिंडलकोप, किटवाड सह कर्नाटकातील हंदिगनूर परिसरातील ग्रामस्थ, प्रवासी व वाहनधारकांतून या बंधाऱ्यावरील सध्याचा स्लॅप काढून त्याच पिलरवर मोठी वाहने जातील असा स्लॅब टाकून पूल तयार करावा अशी मागणी जोर धरू लागली. याबाबतच्या बातम्या अनेक वेळा वर्तमानपत्रांतून व टीव्ही चॅनेल वरून झळकल्या तथापि आश्वासनं पलीकडे काही घडले नाही.

   शेवटी पावसाळ्यातील पाण्याच्या प्रवाहापासून निर्माण होणारा धोका ओळखून कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी येथील दुचाकीसह सर्व प्रकारची वाहतूक ०१/०७/२०२४ पासून बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे इतकी वर्षे मागणी असूनही बंधारा दुरुस्ती, रुंदीकरण अथवा नवीन पूल बांधकाम का केले नाही? असा संतप्त सवाल नदीच्या दोन्ही बाजूकडील ग्रामस्थांतून होत आहे. दरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद करण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला झाडे- झुडपे तोडून टाकून अडथळा केला असला तरी तो बाजूला करून पुढे जाण्याची दुचाकी धारकांची धडपड सुरू असल्याचे चित्र काल दिसत होते.  तर आज सकाळ होण्यापूर्वीच टाकण्यात आलेले सर्व अडथळे नदीत फेकून पूर्ववत वाहतूक झाली आहे यावर आता जिल्हाधिकारी काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment