बेकायदेशीर दारू वाहतूक, मलतवाडीचे दोघे ताब्यात....!, दोडामार्ग पोलीसांच्या कारवाईत ३.२० लाखांचा मुद्देमाल जप्त - चंदगड लाईव्ह न्युज

02 July 2024

बेकायदेशीर दारू वाहतूक, मलतवाडीचे दोघे ताब्यात....!, दोडामार्ग पोलीसांच्या कारवाईत ३.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

    

गुन्ह्यात जप्त केलेले वाहन, दारू बॉक्स व संशयित आरोपींसह दोडामार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी.

दोडामार्ग : सी. एल. वृत्तसेवा

     तळकट (ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) नजीकच्या जंगलमय मार्गावरून बेकायदेशीर रित्या दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना दोडामार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे ३ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुंडु सटुप्पा तरवाळ, (वय ४२ वर्षे) व जोतिबा मायाप्पा पोवार (वय ५५ वर्षे) दोघेही रा. मलतवाडी, ता चंदगड, जि. कोल्हापूर अशी त्यांची नावे आहेत. याबाबत विजय सुरेश जाधव पोलीस कॉन्स्टेबल दोडामार्ग यांनी फिर्याद नोंदवली आहे.   

       याबाबत दोडामार्ग पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, वरील दोन्ही संशयित दोडामार्ग पोलीस ठाणे हद्दीतील तळकट येथील प्राथमिक शाळा क्रमांक १ समोरील जंगलमय भागातील रस्त्यावरून १ जुलै २०२४ रोजी रात्री ११ वाजता पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी हे सपोनी गवस, हवालदार मळगवकर, पो. शिपाई विजय जाधव यांच्यासह प्रोविबेशन पेट्रोलिंग करीत असताना आपल्या ताब्यातील सिल्व्हर कलरच्या मारुती सुझुकी कंपनीच्या ओमनी कार मधून बेकायदेशीर रित्या दारू वाहतूक करताना आढळले. यात गोल्डन आईस ब्ल्यू, हनी ग्रेड ब्रँडी अशा कंपनीच्या विविध आकाराच्या दारूच्या बाटल्यांचा समावेश आहे. यातील दारूची किंमत १ लाख २० हजार तर गाडीची किंमत २ लाख असा एकूण ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून दोन्ही संशयित आरोपींवर दोडामार्ग पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर 66/2024 महा दारू बंदी, कलम 65 (अ)(ई),81, 83 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार गवस करत आहेत.

No comments:

Post a Comment