दाटे जवळ पुराचे पाणी ओसरले, बेळगाव- वेंगुर्ले मार्ग खुला, प्रवाशांना दिलासा...! कोवाड जैसे थे - चंदगड लाईव्ह न्युज

28 July 2024

दाटे जवळ पुराचे पाणी ओसरले, बेळगाव- वेंगुर्ले मार्ग खुला, प्रवाशांना दिलासा...! कोवाड जैसे थे

ताम्रपर्णीच्या पुराचे पाणी दाटे नजीक रस्त्यावरून ओसरत असल्याचे छायाचित्र

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
      गेले चार दिवस ताम्रपर्णी नदीच्या पुराचे पाणी दाटे गावाजवळ बेळगाव वेंगुर्ले राज्य मार्गावर आले होते. यामुळे बेळगाव ते चंदगड, आंबोली, सिंधुदुर्ग व गोवा राज्यात होणारी वाहतूक ठप्प झाली होती. आता हे पाणी कमी झाल्यामुळे प्रवासी, वाहतूकदार यांना दिलासा मिळाला आहे.
     काल दिनांक २७ जुलै रोजी पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतल्यामुळे पूर पातळी कमी होऊ लागली आहे. तीन ते चार फूट आलेले पाणी ओसरल्याने रस्त्यावरून वाहने जाऊ शकतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज पुन्हा पाऊस थांबल्यास पाणी अजून कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे कर्नाटक बेळगाव परिसरातून आंबोली, सिंधुदुर्ग गोवा प्रवास करणारे प्रवासी वाहनधारक यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान कागणी ते कालकुंद्री रस्त्यावर काल सकाळी एक फूट आलेले पाणी सायंकाळी सहा वाजता कमी झाले असून पाणी पातळी दीड फुट ओसरली आहे. त्यामुळे कालकुंद्री- कागणी बेळगाव खंडित झालेली वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.
     पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे ताम्रपर्णी पुराची पातळी हळूहळू कमी होत आहे. मात्र कोवाड व तेथील बाजारपेठेतील स्थिती अजूनही जैसे थे आहे. निट्टूर- कोवाड, कागणी- कोवाड, दुंडगे -कोवाड, तेऊरवाडी - कोवाड हे सर्व रस्ते अजूनही पाण्याखाली आहेत. पाऊस पूर्ण कमी झाल्यास दोन दिवसात पोवाडा येथील परिस्थिती पूर्वपदावर येईल, अशी शक्यता आहे.

No comments:

Post a Comment