विकासापासून वंचित लमानवाडा ग्रामस्थांचा विधानसभा व अन्य निवडणूकांवर बहिष्कार...! - चंदगड लाईव्ह न्युज

31 July 2024

विकासापासून वंचित लमानवाडा ग्रामस्थांचा विधानसभा व अन्य निवडणूकांवर बहिष्कार...!

विधानसभा निवडणुकीसह सर्वच निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देणारे निवेदन ग्रामपंचायत हडलगे यांना देताना लमान वस्तीतील नागरीक

नेसरी /सी एल वृत्तसेवा
      हडलगे (ता. गडहिंग्लज) येथून जवळच असणाऱ्या व हडलगे ग्रामपंचायत अंतर्गत येणारी लमानवाडा वस्ती विकासापासून वंचित राहिली आहे. येथे जाण्यासाठी पक्का रस्ताही नाही. गेली कित्येक वर्षे रस्त्याची मागणी करूनही रस्ता मिळत नसल्याने अखेर येथील रहिवाशांनी येत्या विधानसभा व इतर सर्वच निवडणूकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन नुकतेच हडलगे ग्रामपंचायतीला दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
लमान वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्याची झालेली दुरावस्था

    वनविभागाच्या हद्दीतून लमानवाडयाकडे जाणाऱ्या या पूर्ण कच्च्या रस्त्यावर पाणी साठून सर्वत्र तळ्याचे रूप आले आहे. दुचाकी तर सोडाच पण पायी जाणे शक्य होत नाही. निवेदनात देश स्वतंत्र होवून ७५ वर्षे उलटली तरीही येथील ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वस्तीतल्या रस्त्यावर अजून लाईटची सोय नाही, प्यायला स्वच्छ शुद्ध पाणी नाही, आरोग्य सुविधा नाही की साधी अंगणवाडी नाही. एखादी दुर्घटना घडली तर मदत पोहोचवण्यासाठी रस्ताच नसल्याने अग्निशामक बंब गाडी किंवा रुग्णवाहिका पोहचू शकत नाही. यावरून प्रशासन यंत्रणा येथील  लोकांच्या जीवाशी खेळ खेळत आहे की काय? असा प्रश्न पडतो. या वस्तीमध्ये राजकीय लोक येतात ते स्वत:च्या स्वार्थासाठी केवळ मतांचा जोगवा मागायला. अनेक आश्वासने देवून निवडून येतात. परत ५ वर्षे या वस्तीकडे  पाहतही नाहीत. त्यामुळे वस्तीतील सर्व नागरिकांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
 हे निवेदन हडलगे ग्रामपंचायतीचे सरपंच हणमंत पाटील यांच्याकडे सदस्य दीपक कांबळे, सुधिर पाटील, सौ प्रिया पाटील आदींच्या उपस्थितीत देण्यात आले. निवेदनावर पुंडलिक लमान, पांडूरंग लमान, रविंद्र लमान, श्रीमती रत्नाबाई लमान, सुरेश लमान, प्रकाश लमान, राजू लमान, मंगेश लमान, श्रीमती शांता लमान, बाळू लमान आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment