किटवाड धबधबा पाहायला पर्यटकांची गर्दी, किटवाड नजीकचे दोन्ही ल. पा. बंधारे ओव्हर फ्लो - चंदगड लाईव्ह न्युज

31 July 2024

किटवाड धबधबा पाहायला पर्यटकांची गर्दी, किटवाड नजीकचे दोन्ही ल. पा. बंधारे ओव्हर फ्लो

 

किटवाड धबधबा पाहायला पर्यटकांची गर्दी, किटवाड नजीकचे दोन्ही ल. पा. बंधारे ओव्हर फ्लो

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

  किटवाड, ता. चंदगड नजीकचे दोन्ही बंधारे ओव्हर फ्लो झाले असून सांडव्यातील धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाल्याने परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. 

   कालकुंद्री, कुदनूर व किटवाड हद्दीत कृष्णा खोरे विकास योजनेतून सन १९९६-९७ मध्ये हे दोन लघुपाटबंधारे तलाव बांधण्यात आले होते. शिवसेना-भाजप युती शासन काळात मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन आमदार कृष्णा खोरे विकास महामंडळाचे सदस्य व माजी मंत्री भरमूआण्णा पाटील यांचे योगदान मोलाचे ठरले होते. या दोन्ही धरणांमुळे परिसरातील शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली आली असून अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.

  पावसाळ्यापूर्वी ८० टक्के रिकामी केलेले हे लघु पाटबंधारे तलाव गेल्या काही दिवसांतील दमदार पर्जन्यवृष्टीमुळे दोन दिवसांपूर्वी ओव्हर फ्लो झाले आहेत. 

  धरण क्रमांक १ च्या सांडव्यातील ओव्हर फ्लो झालेल्या पाण्यापासून तयार झालेला धबधबा तसेच झिगझॅग ओसंडून वाहणारे पाणी, अल्हाददायक व नयनरम्य परिसर यामुळे गेल्या काही वर्षात इकडे पावसाळी पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. यंदाही रोज शेकडो पर्यटक दोन्ही धरणांना भेट देऊन सहकुटुंब पर्यटनाचा आनंद लुटत आहेत.


ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडून आवाहन

  गेल्या चार-पाच वर्षात किटवाड धरण व धबधबा परिसरात आलेल्या सुमारे पंधरा पर्यटकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे आलेल्या पर्यटकांनी स्वतःच्या जबाबदारीवर सुरक्षित पणे आनंद लुटावा. धरण, सांडवा व धबधबा परिसरात प्लॅस्टिक कचरा, काचेच्या बाटल्या आदी कचरा करू नये. हुल्लडबाजी करता पर्यटनाचा आनंद लुटावा. आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्यांवर कटू कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस ठाणे चंदगड व ग्रामपंचायत किटवाड यांच्या वतीने देण्यात आला आहे.


No comments:

Post a Comment