हिरण्यकेशी वरील भडगाव पुलाला पर्यायी पूलाच्या मागणीसाठी ठाकरे शिवसेनेचे अर्ध जलसमाधी आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

27 July 2024

हिरण्यकेशी वरील भडगाव पुलाला पर्यायी पूलाच्या मागणीसाठी ठाकरे शिवसेनेचे अर्ध जलसमाधी आंदोलन

भडगाव पुलाला पर्यायी पूल बांधणीच्या मागणीसाठी अर्ध जलसमाधी आंदोलन करताना ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी
चंदगड : सी एल वृत्तसेवा
       गडहिंग्लज नजीकच्या भडगाव पुलाला पर्यायी दुसरा पूल बांधावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने पुलाच्या परिसरात अर्ध  जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे व पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनापूर्वी याबाबतचे निवेदन गडहिंग्लज चे उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले होते.
       गडहिंग्लज नेसरी दरम्यान हिरण्यकेशी नदीवर भडगाव नजीक असलेला पूल पावसाळ्यात नेहमी पुराच्या पाण्याखाली जातो. यामुळे गडहिंग्लज ते नेसरी, चंदगड, कोवाड, बेळगाव भागातील सर्व वाहतूक ठप्प होते. या दोन्ही भागांना जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. तोच बंद झाल्यामुळे नोकरदार, आजारी रुग्ण, विद्यार्थी व नागरिकांची मोठी गैरसोय होते. पुराच्या वेळी आलेले पाणी कधी ४-५ दिवस पर्यंत कमी होत नाही. परिणामी गडहिंग्लज शहरापासून जवळच असणाऱ्या भडगाव, हुनगीनहाळ, हरळी, महागाव, जरळी, मुगळी, चन्नेकुपी आदी परिसरातील शेतकऱ्यांना आपला भाजीपाला विकणे अवघड होते. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होते. त्याचबरोबर गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागात हलकर्णी, तेरणी, नरेवाडी, हिडदुगी परिसरातील नागरिक याच पुलावरून जात असतात. पुलावरील वाहतूक बंद झाल्याने या भागातील ग्रामस्थांना नॅशनल हायवे वरून संकेश्वर मार्गे गडहिंग्लजला जावे लागते. यात त्यांचा वेळ व पैसा वाया जातो. 
      अनेक वर्षे या पुलाला पर्यायी उंच पूल उभारावा अशी मागणी होत असली तरी ती शासन व प्रशासनाकडून दुर्लक्षित आहे. याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने काल दिनांक २६/०७/२०२४ रोजी पुराच्या पाण्यात अर्ध जलसमाधी आंदोलन करण्यात आले.
   गडहिंग्लज प्रांताधिकारी व डी. वाय. एस. पी. यांना देण्यात आलेल्या निवेदनावर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील अर्जुन  शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू रेडेकर, गडहिंग्लज तालुकाप्रमुख अजित खोत व दिलीप माने, आजरा तालुका प्रमुख युवराज पवार, चंदगडचे प्रभारी तालुका प्रमुख महेश पाटील, जिल्हा युवा सेना अधिकारी अवधूत पाटील, उप तालुकाप्रमुख  सुधाकर जगताप व सुरेश हेब्बाळे, विभाग प्रमुख दिगंबर पाटील, उपशहर प्रमुख संदीप चव्हाण उपस्थित होते.

No comments:

Post a Comment