चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांचा समावेश होणार असल्याने विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी हा अभ्यासक्रम नीटपणे समजून घेण्याची गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे पारंपारिक शिक्षण पद्धती धोक्यात आली असल्याचे मत नेसरी येथील तुकाराम कोलेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. भांबर यांनी व्यक्त केले.
ते चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात आय. क्यू. ए. सी. ॲडमिशन कमिटी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या (एन.इ. पी.) नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते.
प्राचार्य डॉ भांबर मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, आता सर्वच विद्यार्थ्यांना कोणत्याही शाखेचा कोणताही विषय निवडण्याचे स्वातंत्र्य असल्याने, या अनोख्या आंतरविद्याशाखीय प्रवेश प्रक्रियेमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असल्या तरी नवीन शैक्षणिक धोरणाचा मूळ ढाचा समजून घेणे गरजेचे आहे, ऑनलाइन व ऑफलाइन अभ्यासक्रम समजून घेणे गरजेचे आहे. ज्ञानाचे वैविध्यपूर्ण प्रकार, व नवीन शैक्षणिक धोरण समजून घेण्यासाठी, व धोरण यशस्वीपणे राबवण्यासाठी विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकानी या नवीन शिक्षण प्रक्रियेचा अभ्यास करणे गरजेचे असून, याप्रसंगी येणाऱ्या विविध अडथळ्यावर मात करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.अध्यक्ष भाषणात बोलताना प्र. प्राचार्य डॉ. एस. डी.गोरल म्हणाले की,नवीन शैक्षणिक धोरणामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे. कौशल्यावर आधारित असणारा हा अभ्यासक्रम प्रभावीपणे अध्यापन करण्यासाठी प्राध्यापकांनी या संदर्भातील वेगवेगळ्या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक डॉ. पी. एल. भादवणकर यांनी करून महाविद्यालयीन स्तरावर नवीन शैक्षणिक धोरणामुळे येणाऱ्या विविध समस्यांची माहिती देऊन ही कार्यशाळा आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. सूत्रसंचालन सहसमन्वयक डॉ. एन. एस. मासाळ यांनी केले. तर आभार डॉ. नामदेव पाटील यांनी मांडले. या कार्यशाळेला lQACचेअरमन डॉ.राजकुमार तेलगोटे यांच्यासह महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment