![]() |
दुंडगे बंधाऱ्यावरून ताम्रपर्णी नदीचे पाणी वाहत आहे. |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील जीवन वाहिनी ताम्रपर्णी नदीने रौद्ररूप धारण केल्यामुळे नदीच्या पुराचे पाणी काठावरील गावे तसेच शिवारात पसरले आहे. चंदगड तालुक्यातील सर्वच जनजीवन महापुरामुळे गेले चार दिवस ठप्प झाले आहे. पावसाची स्थिती अशीच राहिल्यास परिस्थिती आणखीनच चिंताजनक होणार आहे. महापुरामुळे कोवाड बाजारपेठेत पूर्ण बुडाली असून 2019 च्या स्थितीकडे वाटचाल सुरू असल्याने नागरिक व व्यापारी भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.
गेल्या आठ-दहा दिवसापासून संततधार पावसामुळे चंदगड तालुक्यातील सर्वच बंधारे आठ दिवसांपासून पाण्याखाली गेले होते. त्यात आता मुळातच वाहतूक बंद केलेल्या कुदनूर ते दुंडगे दरम्यानच्या बंधाऱ्याची भर पडली आहे. दरम्यान आज दि २७ जुलै २०२४ रोजी सकाळी कालकुंद्री ते कागणी रस्त्यावर गुडघाभर पाणी असून त्यातून सध्या वाहने जात असली तरी आणखी थोडी जरी पातळी वाढली तरी वाहतूक पूर्णपणे बंद होणार आहेत. तथापि कालकुंद्री, कुदनूर, राजगोळी, दड्डी हत्तरगी रस्ता वाहतुकीसाठी खुला असून कालकुंद्री, कुदनूर, खन्नेटी तसेच दिंडलकोप मार्गे बेळगाव रस्ता खुला आहे.
तालुक्यातील चंदगड ते वेंगुर्ला राज्य मार्ग दाटे गावानजीक रस्त्यावर पाणी आल्यामुळे गेले ३-४ दिवस बंद असून बेळगाव ते आंबोली, सिंधुदुर्ग, गोवा भागात जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. बऱ्याच ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याने घरगुती उपकरणे बंद आहेत. तर शासनाच्या पिक विमा योजना लाडकी बहीण अशा योजनांची ऑनलाईन नोंदणी ठप्प झाली आहे. दरम्यान वीज वितरण कंपनीचे कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत राहावा यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
No comments:
Post a Comment