कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कागणी ते राजगोळी मार्गावरील कागणी ते कालकुंद्री दरम्यान रस्त्यावर रेन ट्री वृक्षाची फांदी मोडून पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत ही फांदी मोडलेल्या अवस्थेत रस्त्यावरच पडून होती. त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाने रस्त्याकडेला धोकादाय स्थितीत असलेल्या या झाडांच्या फांद्या अपघातापूर्वीच तोडून टाकाव्यात अशी मागणी होत आहे.
गेल्या काही वर्षांत सावली साठी म्हणून लावण्यात आलेली रेन ट्री झाडे सर्वत्र फोफावली आहेत. या झाडांच्या आक्रमणापुढे मुळे देशी झाडांची संख्या कमालीची घटली आहे. केवळ सावळी साठी असणाऱ्या या झाडाच्या फांद्या ठिसूळ असल्याने थोड्याशा वादळात सुद्धा या फांद्या मोडून रस्त्यावर पडतात. मानवी वस्ती व रस्त्यावरील अशी झाडे प्रवासी, वाहनधारक व नागरिकांसाठी जीवघेणी ठरू शकतात. ठिसूळ असल्यामुळे जळण, इमारत, फर्निचर यासाठीही याचे लाकूड निरुपयोगी असून झाडाला फळे लागत नसल्याने पशु पक्षांसाठी ही कुचकामी आहेत. या झाडाच्या चिकट पदार्थ असलेल्या लांब शेंगा डांबरी रस्त्यावर पडल्यास झाडांच्या टायर खाली सापडून तिथेच चिकटून बसतात. परिणामी चांगले डांबरी रस्ते खराब होत आहेत. त्यामुळे रस्त्याकडेला असलेले रेन ट्री बांधकाम विभागाने तोडून टाकावेत व त्या ठिकाणी नवी देशी झाडे लावावीत अशी मागणी शेतकरी, प्रवासी व वाहनधारकातून होत आहे.
दरम्यान कागणी रस्त्यावरील मोडून पडलेली फांदी दिवसभर कोणीही काढली नाही. सर्व वाहने रस्त्यावर पडलेल्या फांदीला वळसा घालून जात होती.
No comments:
Post a Comment