विद्यार्थ्यांनो ध्येय पूर्तीसाठी प्रयत्नशील रहा - कथाकार जयवंत आवटे, चंदगड महाविद्यालयाचा 27 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

02 August 2024

विद्यार्थ्यांनो ध्येय पूर्तीसाठी प्रयत्नशील रहा - कथाकार जयवंत आवटे, चंदगड महाविद्यालयाचा 27 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा



चंदगड / सी एल वृत्तसेवा

      ध्येयपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी सतत प्रयत्नशील असायला हवे. आई- वडील व शिक्षक यांच्या संस्काराची जोपासना केल्यास निश्चित यश गाठता येते त्यासाठी जिद्दीने पेटून उठले पाहिजेत असे प्रतिपादन  प्रसिद्ध कथाकार जयवंत आवटे यांनी केले.

    ते चंदगड येथील र भा माडखोलकर महाविद्यालयाच्या 27 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी एस. आर. पाटील होते.

     जयवंत आवटे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्याला आवडणारी कला जोपासावी, वाचन वाढवावे, मातीशी नाळ जुळून नम्रपणे  विद्यार्जन केल्यास हमखास यशस्वी होता येते, असे सांगून त्यांनी  आपल्या बहारदार कथाकथनाने विद्यार्थ्यांची व उपस्थितांची मने जिंकली.

      यावेळी बोलताना आमदार अरुण अण्णा  लाड म्हणाले की, पुरोगामी विचाराचा वारसा जोपासणाऱ्या, या संस्थेशी आपला जुना ऋणानुबंध आहे. बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळू नये अशी सद्यस्थिती असली तरी आपण सर्वांनी संघटितपणे कार्यरत असताना हवे, असे सांगून त्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी पाच लाखाची देणगी दिली.

 प्रारंभी प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी करून महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. उद्योगपती दयानंद काणेकर यांच्या व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला जलार्पण करून  उद्घाटन झाले. उद्योगपती व चंदगड अर्बन बँकेचे चेअरमन  दयानंद काणेकर यांनी विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची  सोय व्हावी म्हणून  स्वखर्चातून जलशुद्धी सयंत्र भेट दिले. पाहुण्यांचा परिचय प्रा. आर पी पाटील यांनी करून दिला. सूत्रसंचालन व आभार प्रा. ए डी कांबळे यांनी मांडले.

 यावेळी विविध क्रीडा  स्पर्धांमधून व विद्यापीठात गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या  यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला..

 यावेळी माजी प्राचार्य डॉ. पी आर पाटील यांनी विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन कॉलेजच्या समोर स्वखर्चातून बस थांबा बांधण्याचे जाहीर केले. यावेळी माजी प्राचार्य डॉ एस पी बांदवडेकर, उद्योगपती दयानंद काणेकर, डॉ पी आर पाटील. यांनी मनोगत व्यक्त केले.

     यावेळी मुख्याध्यापक एन डी देवळे,, डॉ एस पी बांदिवडेकर, अशोकआप्पा पाटील ,डॉ पी आर पाटील, अॅड. आर पी बांदिवडेकर, इंजिनीयर तुपारे, एल डी कांबळे, सतीश सबनीस, एस व्ही गुरबे, सुरेश सातवणेकर यांच्यासह विविध मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment