कोवाड बाजारात बकरी व कोंबड्या खरेदीसाठी गर्दी - चंदगड लाईव्ह न्युज

03 August 2024

कोवाड बाजारात बकरी व कोंबड्या खरेदीसाठी गर्दी

 

कोवाड आठवडी बाजारात गटारी पूर्वी बकरी खरेदीसाठी गर्दी झाली होती.

कुदनूर : सी एल वृत्तसेवा

     गटारी अमावस्येच्या पूर्व-संध्येवर कोवाड येथील आठवडी बाजारात बकरी, कोंबड्या, मासे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली. 

     सोमवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिन्यात बरेचसे लोक मांसाहार वर्ज्य करतात. महिनाभर मांसाहार बंद करावा लागणार त्यामुळे श्रावण महिन्यापूर्वीच्या गताहरी (गटारी) अमावस्येला मांसाहारी खवय्यांची चिकन, मटण, मासे, खेकडे खरेदीसाठी झुंबड उडते. चंदगड तालुक्याच्या पूर्व भागात अनेक रस्सा किंवा रक्तीमंडळे आहेत. गटारी अमावस्याला ग्रुप करून बकरी कापण्याची प्रथा आहे. त्यामुळे अशी मंडळे व ग्राहकांनी महापूरातून वाट काढत गुरुवारी कोवाड च्या आठवडी बाजारात बकरी, कोंबड्या खरेदीसाठी गर्दी केली होती. खरेदीदारांची गर्दी होणार याचा अंदाज आधीच असलेल्या विक्रेत्यांनी मोठ्या संख्येने ग्राहकांना बकरी उपलब्ध करून दिली होती. बकरी सात ते वीस हजार रुपये पर्यंत तर कोंबड्यांचे दर अडीचशे रुपये पासून पुढे सुरू होते यावेळी मासे खरेदीसाठीही ग्राहकांनी गर्दी केल्याचे दिसत होते. 

   दरम्यान गेले पंधरा दिवस कोवाड बाजारपेठेला महापुराचा विळखा बसलेला आहे. जुन्या बंधाऱ्यावरून अद्याप दोन फूट पाणी वाहत आहे. या भागातील दुंडगे रस्त्यावरील बाजारपेठेत अद्यापही पाणी आहे. परिणामी बाहेरून येणारे अनेक व्यापारी बाजारात पोहोचले नाहीत. सखल भागात दुकानात पाणी शिरणाऱ्या दुकानदारांनी अद्याप आपली दुकाने सुरू केली नाहीत. त्यामुळे बकरी, मासे, कोंबड्या बाजारा व्यतिरिक्त अन्य खरेदीसाठी शुकशुकाटच दिसत होता.

No comments:

Post a Comment