गटसाधन केंद्राकडे जाण्याची दलदलीत हरवलेली वाट दाखवताना मनसे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाटील |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड येथील पंचायत समिती आवारातील शिक्षण विभागाशी संबंधित 'गट साधन केंद्र' (बीआरसी) व अंगणवाडी संबंधित 'एकात्मिक बाल विकास केंद्रा'च्या इमारती दलदल व समस्यांच्या विळख्यात सापडल्या आहेत. या दोन्ही इमारतींमध्ये जाण्यासाठी असलेल्या मार्गावर झाडे-झुडपे, रान, चिखल व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येत्या १५ ऑगस्ट पर्यंत येथील वाटेची दुरुस्ती न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाटील व कार्यकर्त्यांनी दिला आहे.
बी आर सी व एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात अनुक्रमे शिक्षण क्षेत्राशी संबंधित शिक्षक, पालक, अंगणवाडी सेविका मदतनीस यांची कामानिमित्त वर्दळ असते. तालुक्यातील मनसे चे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाटील व त्यांचे सहकारी कामानिमित्त दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी गेले असता त्यांना दोन्ही कार्यालयांच्या इमारती दलदल, वाढलेला झाडोरा, चिखल, दुर्गंधी व घाणीच्या विळख्यात सापडलेल्या दिसल्या. हे दृश्य पाहिल्याबरोबर कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. या दोन्ही कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा, अंगणवाड्यांत भेटी देऊन तेथील स्वच्छतेची पाहणी करत असतात. तिथे अस्वच्छता दिसली तर ताशेरे ओढणारे अधिकारी स्वतः मात्र दलदलीत बसल्याचे विदारक चित्र मनसे कार्यकर्त्यांना दिसून आले.
दोन्ही कार्यालयांमध्ये चिखलातून वाट काढत जावे लागते. आत जाण्यासाठी येथील चिखलात सुट्टे पेविंग ब्लॉक टाकून तात्पुरती वाट केल्याचा केविलवाणा प्रयत्न दिसून आला. त्यावरून उड्या मारतच कार्यालयात जावे लागते. यावेळी अपंग पालक, शिक्षक किंवा अंगणवाडी कर्मचारी आल्यास त्यांची अवस्था काय होईल याची कल्पनाच केलेली बरी. विवेक पाटील यांनी अधिक चौकशी केली असता सन २००३ च्या सुमारास बांधलेल्या या इमारतीला बांधल्यापासून एकदाही देखभाल दुरुस्ती अनुदान मिळाले नसल्याचे समजते. तर बीआरसी इमारत व संलग्न कॉन्फरन्स हॉलच्या सुशोभीकरणासाठी येथील कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील काही शिक्षकांनी दिलेल्या आर्थिक मदतीतून इमारत रंगरंगोटी, टेबल, खुर्च्या, फर्निचर, स्पीच बॉक्स आदी साहित्य उपलब्ध करून घेतल्याचे समजते. तथापि इमारतींच्या बाहेरची विदारक परिस्थिती चीड आणणारी आहे. या दोन्ही कार्यालयांशी संबंधित वरिष्ठ कार्यालयाने याची गंभीर दखल घेऊन पंधरा दिवसांच्या आत परिसर स्वच्छतेबरोबरच आत जाण्याच्या वाटेवर पेविंग ब्लॉक किंवा तत्सम सुविधा उपलब्ध कराव्यात. अन्यथा चंदगड तालुका मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाटील, तालुका सचिव तुकाराम पाटील, तालुका अध्यक्ष राज सुभेदार, संभाजी मनवडकर, सुनील तलवार, जोतिबा भोगण, अरुण कित्तुरकर, अमर प्रधान, भावकू नाईक, रमेश पाटील, शुभम पाटील आदींनी दिला आहे. याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी चंदगड यांना देणार असल्याचे यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment