मागणी तीच, निवेदन देणारे व घेणारे वेगळे....!, दुंडगे बंधाऱ्याचे भिजत घोंगडे - चंदगड लाईव्ह न्युज

04 August 2024

मागणी तीच, निवेदन देणारे व घेणारे वेगळे....!, दुंडगे बंधाऱ्याचे भिजत घोंगडे

 



वाहतुकीस बंदी घातलेल्या दुंडगे बंधाऱ्याला पर्यायी पुल उभारावा या मागणीचे निवेदन माजी खा. संभाजीराजे यांना देताना कार्यकर्ते 

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

       'नेमेची येतो मग पावसाळा' या उक्तीप्रमाणे एखादा अपघात घडला किंवा महापूर आला की ताम्रपर्णी नदीवरील दुंडगे व कुदनूर दरम्यानच्या बंधार्‍याबाबत चर्चा सुरू होते. याची प्रचिती नुकतीच पुन्हा एकदा आली.

       पिलर कमकुवत झाल्यामुळे यंदा १ जुलै २०२४ पासून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने वाहतूक बंद झालेल्या या बंधाऱ्याच्या ठिकाणी नवीन पूल उभारावा अशा मागणीचे निवेदन नुकतेच माजी जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगण, उद्धव ठाकरे शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख राजू रेडेकर आदींनी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांना दिले. यापूर्वी गेल्या चार-पाच वर्षात अशी निवेदने मंत्री, आमदार, खासदार यांना देण्यात आली आहेत. त्याचे पुढे काय झाले हे गुलदस्त्यात आहे. आत्ता पुन्हा एकदा याच आशयाचे निवेदन दिल्यामुळे मागणी एकच पण देणारे व घेणारे वेगळे! असे म्हणायची वेळ प्रवासी, वाहनधारक व परिसरातील ग्रामस्थांवर आली आहे.

    दुंडगे (ता.चंदगड) नजीक ताम्रपर्णी नदीवर २५ वर्षांपूर्वी पाणी अडविण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला. बांधकाम सुरू असताना बंधाऱ्यावरून वाहतूक होण्याच्या दृष्टीने रुंदी वाढवावी. अशी झालेली मागणी धुडकावण्यात आली होती. तथापि ज्या उद्देशाने बंधाऱ्याचे बांधकाम झाले तो पाणी अडवण्याचा उद्देशही कधी यशस्वी झाल्याचे दिसले नाही. रुंदी कमी असल्यामुळे वाहतुकीसाठी ही होत नाही किंबहुना पहिल्यापासून छोटी चार चाकी वाहने व दुचाकी वाहने वगळता कुठलीही वाहने यावरून नेण्यास बंदी आहे. तरीही गेल्या काही वर्षांत या बंधाऱ्यावरून धोका पत्करून मोठी वाहने घालण्याच्या प्रयत्नात किमान सात आठ जणांना वाहनासह नदीत जलसमाधी मिळाली आहे. बऱ्याच वेळा दुचाकीला अपघात होऊन वाहने नदीपात्रात कोसळली व त्यातही काहींचा जीव गेला आहे. अशा प्रत्येक अपघाताच्या वेळी रुंदी वाढवावी किंवा पाणी अडवण्यासाठी कुचकामी ठरलेला हा बंधारा काढून वाहतुकीसाठी पूल बांधावा अशी मागणी होत असते. प्रत्येक वेळी निवेदने दिली जातात ती घेऊन आश्वासने दिली जातात हे चक्र निरंतर सुरूच आहे. 

        येथे नवीन रूंद व उंच पूल झाल्यास कुदनूर, राजगोळी, दिंडलकोप, किटवाड पासून कर्नाटकातील हंदिगनूर, कडोली, कंग्राळी, बेळगाव पर्यंत च्या लोकांना कोवाडसह नेसरी, गडहिंग्लज, आजरा परिसरात जाण्यासाठी सात-आठ किलोमीटर अंतर कमी होणार आहे. विशेष म्हणजे महापुरात तालुक्यातील सर्व बंधारे पाण्याखाली गेलेले असताना हा बंधारा खुला असतो. सध्या माजी खासदार संभाजी राजे यांचे वडील शाहू छत्रपती महाराज खासदार असल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागावा अपेक्षेने भागातील नागरिकांच्या वतीने कोवाड भागातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या संभाजीराजे यांना दुंडगे बंधारा बाबतचे निवेदन नव्याने देण्यात आले. यावेळी डॉ.नंदाताई बाभूळकर, अमर चव्हाण, कल्लापा भोगण, राजू रेडेकर, बाबूराव परीट, सतीश निर्मळकर व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment