ओढ्याचे पाणी रस्त्यावरून गेल्याने बाजूपट्ट्यांचे नुकसान कागणी- कालकुंद्री रस्त्यावर नवीन मोरीची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

02 August 2024

ओढ्याचे पाणी रस्त्यावरून गेल्याने बाजूपट्ट्यांचे नुकसान कागणी- कालकुंद्री रस्त्यावर नवीन मोरीची मागणी

कागणी ते कालकुंद्री मार्गावरील मोरीवरून पाणी ओव्हर फ्लो झाल्याने अशाप्रकारे साईड पट्ट्यांचे नुकसान झाले आहे.
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
    चार दिवसांपूर्वी पडलेल्या मोठ्या पावसामुळे कालकुंद्री ते कागणी मार्गावरील कागणी नजीकच्या ओढ्यावरील मोरीवरून पाणी गेल्याने नवीन केलेल्या रस्त्याच्या बाजू पट्ट्यांचे नुकसान झाले आहे.  वर्षभरात अनेक वेळा मोठा पाऊस पडला की  या रस्त्यावरून पाणी वाहत असते. अशावेळी वाहतूक ठप्प होण्या बरोबरच रस्त्याचेही  नुकसान होते. हे टाळण्यासाठी या ठिकाणी नवीन मोरी चे बांधकाम करावे अशी मागणी होत आहे.
    चंदगड तालुक्यातील पूर्व भागातील हा एक महत्त्वाचा रस्ता आहे गडहिंग्लज, आजरा, नेसरी, कोवाड ते बेळगावला जाणाऱ्या राज्य मार्गाला जोडणारा हा रस्ता कागणी, कालकुंद्री, कुदनूर, राजगोळी, दड्डी ते हत्तरगी येथे राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची मोठी वर्दळ असते. यंदाच्या उन्हाळ्यात हा रस्ता नव्याने खडीकरण, डांबरीकरण केला आहे.  रस्त्याची रुंदी वाढवण्याची मागणी असतानाही पूर्वेप्रमाणेच केवळ दहाबारा फूट रुंदीचा रस्ता ठेवण्यात आला आहे. परिणामी दोन वाहने चार चाकी वाहने समोरासमोर आली तर साईड काढणेही मुश्किल होते. या समस्येमध्ये आता कागणी नजीकच्या मोरीची भर पडली आहे मोरीच्या पाईप मध्ये नेहमी कचरा अडकतो. तर अनेक ग्रामस्थ मोरीवर प्लास्टिक बाटल्या, कचरा व कचरा भरलेल्या पिशव्या फेकत असल्यामुळे त्याचाही ढिगारा झाला आहे. मोरीच्या ढासळलेल्या भिंती पाईपात अडकलेल्या काट्याकुट्या झुडपे व मानवनिर्मित कचरा यामुळे मोरीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. यंदाचा पावसाळा संपताच जुनी मोरी काढून या ठिकाणी काँक्रीट ची नवीन मोरी बांधावी अशी मागणी प्रवासी व वाहनधारकांतून होत आहे.

No comments:

Post a Comment