चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
ग्रामीण रुग्णालय चंदगड येथील ड्युटीवर असलेले डॉक्टर जोहेब मकानदार यांना धमकावून शासकीय कार्यात अडथळा आणल्याबद्दल चंदगड येथील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. संशयीतांवर कठोर शिक्षा करण्याची मागणी वैद्यकीय व विविध क्षेत्रातून होत आहे.
याबाबत चंदगड पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, ग्रामीण रुग्णांलय चंदगड येथे शुक्रवार दिनांक १६/०८/२०२४ रोजी सायंकाळी ७.१० ते ७.४० सुमारास डॉक्टर जोहेब मकानदार ड्युटीवर कार्यरत होते. यावेळी चंदगड येथील गोपाळ कुंभार यांना उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्या डोळ्याच्या वरती दुखापत झाली होती. त्यावर उपचार सुरू करून नर्स मार्फत टाके घालण्याचे काम सुरू होते. इतक्यात दुसरा एक अत्यंत सिरीयस पेशंट हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यामुळे डॉक्टर त्या रुग्णांच्या तपासणीसाठी गेले असता गोपाळ कुंभार व त्यांच्यासोबत आलेल्या दर्शन कुंभार व धीरज कुंभार यांनी डॉक्टरांना धमकावायला सुरुवात केली.
"आम्ही येऊन खूप वेळ झाला, आमचा पेशंट बघणार की पेशंट मेल्यावर ट्रीटमेंट करणार?" अशी अरे तुरेची भाषा वापरून मकानदार यांच्या अंगावर धावून जाणे, "तसेच इथले होऊ दे, तुला बघून घेतो." अशी धमकी तिघांनी द्यायला सुरुवात केली. या प्रकारामुळे मकानदार यांना मानसिक धक्का बसून त्यांना छातीत दुखू लागल्याने हॉस्पिटलमधील दुसरे डॉक्टर हासुरे यांना फोन करून तात्काळ बोलावून घेतले. त्यांनी ट्रीटमेंट केल्यानंतर अधिक उपचारासाठी गडहिंग्लज येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याबाबतची फिर्याद ड्युटीवरील नर्स अमृता लक्ष्मण घोडे यांनी चंदगड पोलिसात दिल्यावरून पोलिसांनी कारवाई करत गोपाळ कुंभार, दर्शन कुंभार व धीरज कुंभार सर्व राहणार चंदगड यांच्यावर भारतीय न्याय समिता 132, 351 (2), 3 (5) प्रमाणे गुन्हा नोंद करून अटकेची कारवाई केली आहे.
या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वैद्यकीय क्षेत्रासह चंदगड तालुक्यातून होत आहे.
No comments:
Post a Comment