मलतवाडी नजीक बारा वासरे कोंबून घेऊन जाणारा टेम्पो पकडला - चंदगड लाईव्ह न्युज

30 August 2024

मलतवाडी नजीक बारा वासरे कोंबून घेऊन जाणारा टेम्पो पकडला

  


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

     बारा रेडके व वासरे भरून नेत असताना टेम्पो कोवाड पोलिसांनी पकडला. यात नेसरी, ता गडहिंग्लज येथील एकास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. माणगाव ते नेसरी रस्त्यावर मलतवाडी नजीक कोवाड पोलिसांनी ही कारवाई केली.  नेसरी कडे जाणाऱ्या या जप्त केलेल्या छोट्या हत्ती वाहनात गाईची चार वासरे तर म्हशींची आठ रेडके दाटीवाटीने कोंबून भरली होती. ती कत्तलीसाठी नेत असल्याचा संशय होता. याबाबतची फिर्याद महांतेश देसाई, मुरकुटेवाडी यांनी पोलिसांत दिली.

      या कारवाईत टेम्पो व वासरे असा एकूण २ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या या घटनेतील संशयित आरोपी विकास बाळकृष्ण नाईक वय २८, रा. नेसरी याला कोवाड दूरक्षेत्र पोलीसांनी टेंपो सह ताब्यात घेतले. त्याच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ व मोटर वाहन कायदा अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. दरम्यान आरोपीस न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीशांनी जामीन मंजूर  केल्याचे समजते. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार जमीर मकानदार हे करत आहेत.

No comments:

Post a Comment