तिलारी घाटातून एसटी बंद, अवजड वाहने मात्र सुसाट, प्रवाशांची ससेहोलपट - चंदगड लाईव्ह न्युज

20 August 2024

तिलारी घाटातून एसटी बंद, अवजड वाहने मात्र सुसाट, प्रवाशांची ससेहोलपट

  

तिलारी घाटातून अवजड वाहने रोखण्यासाठी उभारण्यात आलेल्या कमानी अवजड वाहन धारकांनी उडवून दिल्या आहेत.

चंदगड : सी एल वृत्तसेवा  
   भूस्खलनामुळे वाहतुकीस धोकादायक ठरलेला तिलारी घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी १ जुलै ते ३१ ऑक्टोबर पर्यंत बंद करण्यात आला आहे. येथील वाहतूक रोखण्यासाठी उभारण्यात आलेल्या दोन्ही लोखंडी कमानी जमीन दोस्त करून दहा-बारा व चौदा चाकी अवजड वाहने बिनदिक्कत घाटातून धावत आहेत. तथापि एसटी सेवा बंद झाल्यामुळे विशेषतः चंदगड, बेळगाव व दोडामार्ग तालुक्यातील सर्वसामान्य प्रवाशांची ससेहोलपट सुरू झाली आहे. त्यामुळे एसटी वाहतुकीस जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे.
ट्रक व इतर मोठी वाहने बिनधास्त धावत आहेत 

    कोल्हापूर, बेळगाव, उत्तर कर्नाटक व आंध्रप्रदेश मधून गोवा व कोकणात जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणून तिलारी- दोडामार्ग घाट रस्ता परिचित आहे. तथापि यंदा जून महिन्यात पावसामुळे काही ठिकाणी खचलेला रस्ता व अरुंद वळणावर मोठ्या वाहनांचे वारंवार होणारे अपघात यामुळे कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी हा घाट ३१ ऑक्टोबर पर्यंत सर्व वाहनांसाठी बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यास अनुसरून बांधकाम विभाग चंदगड यांनी आठ किलोमीटर लांबीच्या या घाटात आरंभीच्या ठिकाणी लोखंडी अँगलच्या कमानी उभारल्या होत्या. हलक्या दर्जाचे साहित्य वापरून उभारलेल्या या दोन्ही कमानी अवजड वाहनांनी धडका मारुन चार दिवसांतच मोडून टाकल्या. घाटातून सध्या एसटी वगळता सर्व प्रकारची वाहने बिनधास्त धावत आहेत. मग वाहतूक बंदीचा फायदा काय? असा प्रश्न एसटीच्या प्रवाशांना पडला आहे. 
     दरम्यान रस्ता खचलेल्या ठिकाणी कोणतीच वेगळी उपाययोजना व दुरुस्ती दृष्टिपथात नाही. तुटलेल्या कमानी बेवारस अवस्थेत पडून आहेत. हे पाहता चंदगड बांधकाम विभागाचे इकडे लक्ष आहे का? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
      अवजड वाहनांना पूर्वीपासून या घाटातून वाहतूक बंदी असली तरी गेली अनेक वर्षे कोल्हापूर, बेळगाव, चंदगड, गडहिंग्लज, विजापूर पासून गोवा व सिंधुदुर्गात एसटी वाहतूक सुरू आहे.  बसेस बंद झाल्यामुळे शेकडो प्रवाशांची विशेषतः चंदगड व दोडामार्ग परिसरातील रोज ये जा करणारे विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी यांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे. केवळ दहा-पंधरा किलोमीटर साठी दीडशे किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे. तर अर्ध्या तासाच्या अंतरासाठी पूर्ण दिवस जात आहे. यात मिळकती पेक्षा खर्च जास्त अशी अवस्था झाली आहे. परिणामी असे सर्व प्रवासी बेकायदेशीररित्या धावणारी अवजड वाहने थांबवून त्यातून जीवघेणा प्रवास करत आहेत. 
     अवजड वाहने सोडण्यात दोन्ही तालुक्यातील बांधकाम व पोलीस खात्याचा काही स्वार्थ दडला आहे का? अशीही शंका उपस्थित केली जात आहे. गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येथून मोठ्या प्रमाणात सामान घेऊन वाहने दोडामार्ग व गोव्याकडे धावत आहेत. गणेश चतुर्थी काळात प्रवासी समस्या अधिक भेडसावणार आहे. एसटी पेक्षा दुप्पट बोजड वाहने येथून जात असतील तर एसटीला काय अडचण आहे? असा सवाल करत जिल्हाधिकाऱ्यांनी एसटी पूर्ववत सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment