वामन म्हात्रे वर 'पत्रकार संरक्षण कायदा' अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी चंदगड पत्रकार संघाचे निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

27 August 2024

वामन म्हात्रे वर 'पत्रकार संरक्षण कायदा' अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी चंदगड पत्रकार संघाचे निवेदन

 

तहसीलदार राजेश चव्हाण यांना यांना निवेदन देताना चंदगड पत्रकार संघाचे पदाधिकारी 

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         नुकतीच बदलापूर, जिल्हा ठाणे येथील दोन शाळकरी  मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली. यावेळी  संतप्त पालक व नागरिकांनी या घटनेच्या निषेधार्थ बदलापूर येथे रेल्वे स्टेशन व अन्य ठिकाणी उत्स्फूर्त आंदोलन केले. या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकार मोहिनी जाधव यांना माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांने निर्लज्ज पणे आंदोलनाची बातमी करायला आला आहात; तुमच्यावर बलात्कार झाला आहे का? पत्रकार हे लोकांना भडकवण्याचे काम करतात. पत्रकारांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. अशा प्रकारे अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून  एका महिला पत्रकाराचे चारित्र्य हनन केले. पत्रकारांची गळचेपी करून त्यांचा पर्यायाने जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे.

पोलीस निरीक्षक चंदगड यांच्या वतीने निवेदन स्वीकारताना ठाणे अंमलदार अजित कांबळे, निवेदन देताना चंदगड तालुका पत्रकार संघाचे सदस्य

      या बाबत मोहिनी जाधव तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्या असता पोलीस प्रशासनाने जाणीव पूर्वक सहकार्य केले नाही. ही घटना लोकशाही विरोधी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे. या घटनेने देशातील सर्व पत्रकारांच्या पर्यायाने सर्वसामान्य जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे वामन मात्रे  याच्यावर 'पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी मराठी पत्रकार परिषद संलग्न 'चंदगड तालुका पत्रकार संघाच्या' वतीने करण्यात आली आहे.

    या बाबतचे निवेदन राजेश चव्हाण तहसीलदार चंदगड व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे चंदगड यांना देण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष संतोष सावंत भोसले, माजी अध्यक्ष नंदकुमार ढेरे, पत्रकार संघाचे संस्थापक अनिल धुपदाळे, संपत पाटील, पत्रकार संघाचे सचिव चेतन शेरेगार आदी पत्रकार  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment