चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
एकेकाळी आपल्या देशाने हॉकी या खेळात जागतिक पातळीवर धबधबा निर्माण केला होता दुर्दैवाने आज ती परिस्थिती दिसत नाही, त्यासाठी आपल्या देशात जाणीवपूर्वक क्रीडा संस्कृती रुजवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. एस.व्ही. कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
ते चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा दिन व मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते.
यावेळी बोलताना प्रा. कुलकर्णी पुढे म्हणाले की, मेजर ध्यानचंद यांनी आपले जीवन वाहिले होते. अविरत प्रयत्न करून त्यांनी आपल्या देशाचे नाव उज्वल केले. डॉन ब्रॅडमन, जर्मनीचा हुकूमशाह अडॉल्फ हिटलर ध्यानचंद च्या खेळाने प्रभावित झाले होते. हॉकीचे जादूगार म्हणून विश्ववंद्य ठरलेल्या या महान खेळाडू कडून प खेळाडू कडून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमातून आपले करिअर घडविल्यास यश त्यांच्या पायाशी लोळण घेईल.
अध्यक्ष भाषणात बोलताना डॉ. गोरल म्हणाले की, ``विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता खेळाकडे अधिक लक्ष द्यावे. खेळामुळे राष्ट्राभिमान जागृत होतो, खिलाडू वृत्ती अंगी रूजते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाकडे अधिक लक्ष द्यावे असे आवाहन केले.``
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, क्रीडा संचालक प्रा. एस. एम. पाटील यांनी खेळाचे महत्व विशद करून हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांना भारतरत्न किताब देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. याप्रसंगी महाविद्यालयातील गुणी खेळाडू अभिनव धुरे, रणजीत गडदे, सुप्रिया पाटील, आदित्य पेडणेकर यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले. तर आभार डॉ. एन. एस. मासाळ यांनी मानले.
या कार्यक्रमाला डॉक्टर एस. एस. सावंत, डॉ. एस. एन. पाटील, डॉ. के. एन. निकम, डॉ. एन. के. पाटील, डॉ. एस. डी. गावडे, प्रा. पी. ए. गवस, डॉ. जी. वाय. कांबळे, डॉ. आर. के. सूर्यवंशी, अनिल पाटील यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment