शिनोळी बु" शाळेची संरक्षक भिंत कोसळली, विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पाहणी - चंदगड लाईव्ह न्युज

02 August 2024

शिनोळी बु" शाळेची संरक्षक भिंत कोसळली, विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पाहणी

शिनोळी बुद्रुक शाळेच्या कोसळलेल्या संरक्षक भिंती नजीक मुलींचे स्वच्छतागृह व लगतच असलेली धोकादायक विहीर

चंदगड : सी एल वृत्तसेवा
  चंदगड तालुक्यात सुरू असलेल्या संततधार अतिवृष्टीमुळे शिनोळी बुद्रुक शाळेची संरक्षण भिंत कोसळली. कोसळलेल्या भिंती लगतच शेतात असलेल्या विहिरीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील यांनी नुकतीच शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

    शाळेत इयत्ता पहिली ते सातवी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोसळलेल्या भिंतीच्या पलीकडे अगदी जवळच शेतीला पाणीपुरवठा करणारी खाजगी विहीर असून भिंतीला लागून अलीकडे तीनचार फुटांवर मुलींचे स्वच्छतागृह, मुतारी आहे. मधल्या सुट्टी वेळी मुतारीकडे जाण्यासाठी गर्दी झाल्यास एकमेकांचा धक्का लागण्याचा संभव असतो. अशावेळी ही विहीर जीवघेणी ठरू शकते त्यामुळे संरक्षक भिंतीची तात्काळ उभारणी किंवा पर्यायी व्यवस्था करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. पडझडीची माहिती मिळताच गटशिक्षणाधिकारी यांनी शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. संबंधित विभागाचे अभियंता यांना तात्काळ पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी शाळेतील संगणक लॅब, डिजिटल जनरल रजिस्टर ॲप उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांशी हितगुज करुन त्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्व सांगितले. विद्यार्थी व शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती यांनी समन्वय राखून कार्य करावे अशा सूचना दिल्या.

No comments:

Post a Comment