चंदगड विधानसभा निवडणुकीनंतरची मतमोजणी चंदगड येथेच व्हावी; या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेले बाळासाहेब हळदणकर सोबत पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आलेले कार्यकर्ते. |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड विधानसभा मतदारसंघाची निवडणुकीनंतर मतमोजणी गडहिंग्लज मध्ये केली जाते. त्याऐवजी ती चंदगड मध्येच झाली पाहिजे या मागणीसाठी चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक बाळासाहेब उर्फ आनंद हळदणकर यांनी तहसीलदार कार्यालय चंदगड समोर उपोषण सुरू केले आहे.
वरील प्रमाणे मतमोजणीचे लेखी आदेश प्रशासन व निवडणूक आयोगाने १४ ऑगस्ट पूर्वी काढावेत अन्यथा तहसील कार्यालय चंदगड समोर १५ ऑगस्ट २०२४ पासून उपोषण करण्याचा इशारा हळदणकर यांनी ४ जुलै रोजी तहसीलदार चंदगड यांना निवेदनाद्वारे दिला होता. तसेच या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व निवडणूक आयोग महाराष्ट्र यांना देण्यात आल्या होत्या.
महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी '२७१ चंदगड' हा मतदारसंघ गेल्या १० वर्षांत निर्माण झाला आहे. फेररचनेपूर्वी हा मतदारसंघ महाराष्ट्रातील शेवटचा म्हणजेच '२८८ चंदगड- आजरा' विधानसभा मतदारसंघ म्हणून अस्तित्वात होता. सध्या विधानसभा निवडणुकी वेळी उमेदवारी अर्ज भरून घेण्याचे काम चंदगड मध्ये होत असले तरी निवडणुकीनंतरची मतमोजणी सर्व सुविधा असूनही चंदगड ऐवजी गडहिंग्लज येथे केली जाते. हे पूर्णतः चुकीचे आहे. चंदगड ते गडहिंग्लज अंतर ६० किलोमीटर असल्यामुळे मतदार, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व इतर यंत्रणा यांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. हे टाळण्यासाठी मतमोजणी सह इतर सर्व प्रक्रिया चंदगड मधूनच करावी. मतदार संघाला नाव चंदगडचे मग गडहिंग्लजला मतमोजणी का? असा प्रश्न निवेदनाद्वारे करण्यात आला होता. चार जुलै च्या निवेदनानंतर प्रशासनाकडून कोणत्याच हालचाली न झाल्याने हळदणकर यांनी दि १९ जुलै २०२४ रोजी तहसीलदार चंदगड यांना पुन्हा निवेदन दिले होते. या प्रश्नी लेखी आदेश १४ ऑगस्ट पूर्वी न झाल्यास १५ ऑगस्ट पासून उपोषण करण्याचा इशारा अरुण गवळी, बाबू नेसरकर, देशपांडे, बाळू वाडकर, युवराज मनवाडकर, सिताराम नाईक, जानबा कांबळे, प्रवीण जाधव, शशी मंडलिक, अजय गोवेकर, विकी येरुडकर, बॉबी बल्लाळ, अशोक पेडणेकर, विलास चौकूळकर, जितेंद्र मुळीक, रवी सुतार गोमटेश आदींच्या उपस्थितीत तहसीलदार चंदगड यांना निवेदनाद्वारे दिला होता. तरीही निवडणूक प्रशासनाकडून कोणत्याच हालचाली झाल्याने स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट २०२४ पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
आज उपोषणाचा दुसरा दिवस असून उपोषण स्थळी माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, भाजप नेते शिवाजी पाटील, अथर्व चे चेअरमन मानसिंग खोराटे, शांतारामबापू पाटील, नामदेव कांबळे, नामदेव पाटील, सचिन बल्लाळ, तालुक्यातील विविध पक्षांचे कार्यकर्ते वशीकरण नागरिकांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. तहसीलदार राजेश चव्हाण यांनीही भेटून हळदणकर यांच्याशी चर्चा केली.
No comments:
Post a Comment