कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कुदनूर हे चंदगड तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून परिचित आहे. येथील तरुणांनी विविध क्षेत्रांत अधिकारी व उद्योजक म्हणून लौकिक मिळवला आहे. तथापि गावातील पहिली महिला अधिकारी होण्याचा मान कु. छाया सिद्धाप्पा बंबर्गेकर हिने मिळवला आहे. आई वडील अशिक्षित असताना केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने P. S. I. पदाला गवसणी घातली.
मुळातच हुशार असलेल्या छायाचे प्राथमिक शिक्षण कन्या विद्यामंदिर कुदनूर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कुदनूर तर महाविद्यालयीन शिक्षण राजाराम कॉलेज कोल्हापूर येथे झाले. अर्थशास्त्राची पदवीधर झाल्यानंतर तिने अधिकारी होण्याचे लक्ष्य समोर ठेवून सतत तीन वर्षे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला.
दहावी परीक्षेत कालकुंद्री केंद्रात प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर तिने तेव्हाच अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. आपली जिद्द व अशिक्षित आई-वडिलांची इच्छा पूर्ती करत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. ग्रामीण भागातील विद्यार्थीसुद्धा कष्टाच्या जोरावर वरिष्ठ अधिकारी बनू शकतात याचा आदर्श तिने तालुक्यातील मुला-मुलींसमोर ठेवला आहे. कुदनूर गावासाठी ही अभिमान व गौरवास्पद बाब ठरली असून तिचे गाव व परिसरात कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment