मुंगारे कुटुंबीयांना म्हैस प्रदान करताना संजय गावडे, महेश खवरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, पत्रकार संदीप तारीहाळकर आदी. |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
आठ दिवसांपूर्वी विजेचा शॉक लागून लकीकट्टे पाझर तलावा नजीक चार दुभत्या म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत लकीकट्टे येथील बाबू तानाजी मुंगारे व त्यांच्या कुटुंबीयांच सुमारे चार लाखांचे नुकसान झाले होते.
ही बातमी विविध वृत्तपत्र, न्यूज पोर्टल चॅनेलवर प्रसिद्ध झाली होती. याबाबत सर्वत्र हळहळ होत असताना लकीकट्टे, हुंबरवाडी, मलतवाडी, माणगाववाडी परिसरातील व्हाट्सअप ग्रुप मधून या शेतकरी कुटुंबीयांना मदत करण्याबाबत चर्चा सुरू झाली. यात 'आम्ही चंदगडी- पुणे, पिंपरी- चिंचवडकर' ग्रुपच्या पुढाकाराने संबंधित शेतकऱ्याला काल दि १० ऑगस्ट २०२४ रोजी ९४ हजार रुपये किमतीची मुरा म्हैस मदती दाखल प्रदान करण्यात आली.
विविध प्रसंगी संकटात सापडलेल्या पंचक्रोशीतील नुकसानग्रस्त व्यक्ती व कुटुंबांना पुणे, पिंपरी, चिंचवड भागात नोकरी उद्योग व्यवसायानिमित्त असलेल्या या ग्रुप कडून 'एक हात मदतीचा' या मथळ्याखाली आर्थिक मदत केली जाते. यावेळी त्यांनी मुंगारे कुटुंबियांना ९४ हजार रुपये किमतीची म्हैस देऊन मदत केली. या कामी त्यांना कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळ, ज्योतिर्लिंग मित्र मंडळ, इमर्सन कंपनी ग्रुप, कमिन्स कंपनी ग्रुप, सेंटर ऑफ हॅपीनेस, दहावी बॅच- १९९३, चंदगड कनेक्ट ग्रुप कोल्हापूर, पुणेरी मित्रमंडळ, शिवतेज क्रीडा मंडळ, कामगार चळवळ, आमचे गाव हुंबरवाडी व मलतवाडी ग्रुपची साथ मिळाली. 'आम्ही चंदगडी पुणे पिंपरी चिंचवडकर' ग्रुपचे प्रतिनिधी संजय गावडे (हुंबरवाडी) यांच्या हस्ते म्हैस प्रदान करण्यात आली. यावेळी चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, पत्रकार संदीप तारीहाळकर, संजय कुंभार, धोंडीबा कुट्रे, सट्टुप्पा फडके, विलास खवरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुंगारे कुटुंबीयांच्या वतीने देणगीदारांप्रती ऋण व्यक्त करण्यात आले.
वीज कंपनीने नुकसान भरपाई देण्याची मागणी
लकिकट्टे धरण परिसरातील विद्युत खांब व ओढणीच्या अर्थिंग मधून जमिनीत शॉक उतरला होता, शॉक उतरलेल्या ठिकाणी म्हशी चरत गेल्यामुळे शॉक लागून त्यांचा तडफडून मृत्यू झाला. सुदैवाने म्हशीचे मालक वाचले होते. या दुर्घटनेला वीज वितरण कंपनी जबाबदार असल्याचा आरोप मुंगारे कुटुंबीयांनी केला आहे. पंचनामा व वैद्यकीय अहवाल कंपनीकडे देण्यात आला असून त्यांच्याकडून याबाबत नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी कुटुंबीय व विविध संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. कंपनीने नुकसान भरपाई देण्याबाबत टाळाटाळ केल्यास कोर्टात जाण्याचा इशारा यावेळी कुटुंबीयांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment