गंधर्वगड, वाळकूळी येथून तांब्याचे 10 हंडे व 3 घागरी चोरीला, दोन घरांचे दरवाजे कापले, लाखाचा ऐवज लंपास - चंदगड लाईव्ह न्युज

19 September 2024

गंधर्वगड, वाळकूळी येथून तांब्याचे 10 हंडे व 3 घागरी चोरीला, दोन घरांचे दरवाजे कापले, लाखाचा ऐवज लंपास

चंदगड :  नंदकुमार ढेरे / सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड तालुक्यात अनेक गावात तांब्याचे हंडे व घागरी चोरी जाण्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. यामध्ये चोरांची टोळी सक्रिय आहे. असाच प्रकार गंधर्वगड (ता. चंदगड) येथे बुधवारी दि. 18 (सप्टेंबर 2024) रोजी मध्यरात्री एक ते दोन या दरम्यान  घडला. 

      गंधर्वगड येथे 8 तांब्याचे हंडे व 3 घागरी तर या गावाला जाताना लागणाऱ्या वाळकूळी येथे घरासमोरील 2 तांब्याचे हंडे चोरांच्या टोळीने लांबवले. यादरम्यान गंधर्वगड येथे दोन घरांचे पाठीमागील दरवाजे कापून हंडे चोरून नेले. यामुळे परिसरातील गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

गंधर्वगड : अनंत अमरुस्कर यांच्या घराच्या पाठीमागील खोलीच्या दरवाज्याची कापण्यात आलेली एक बाजू.

       नागनवाडी ते चंदगड या दरम्यान गंधर्वगड ला जाण्याचा फाटा आहे. याच रस्त्यावरून चोरांच्या टोळीने गावामध्ये प्रवेश केला. त्यानंतर बुधवारी दि. 18 रात्री एक नंतर हा प्रकार घडल्याचा संशय ग्रामस्थांना आहे. दोन घरांचे पाठीमागील दरवाजे कापल्याने चोरटे वेगवेगळी हत्यारे घेऊन वावर करत असावीत, यामुळे परिसरात भीती आहे.

       गंधर्वगड (ता. चंदगड) येथील नवल यादव यांच्या घराचा पाठीमागून दरवाजा कापून खोलीत प्रवेश करून तांब्याचा हंडा चोरून नेला. यावेळी त्या खोलीला लागून असणाऱ्या खोलीमध्ये शारदा यादव या वयस्कर महिला होत्या. चोरी होत असल्याची चाहूल त्यांना लागली मात्र  त्या भीतीपोटी बाहेर आल्या नाहीत. चोरट्यानी पाठीमागच्या खोलीतून तांब्याचा हंडा चोरून नेला. अशाच प्रकारे अनंत अमरुस्कर (ता. चंदगड) यांच्याही घराच्या पाठीमागील दरवाजाची एक बाजू अर्धी कापण्यात आली आणि त्या खोलीत प्रवेश करून तांब्याचा हंडा लंपास केला.

     यासह हरिबा यादव, शिवाजी साळोखे, मष्णू अमरुस्कर, चाळोबा सरनोबत, सुरेश होडगे यांचा प्रत्येकी एक तांब्याचा हंडा चोरीला नेला. त्याचबरोबर चाळोबा सरनोबत यांच्या  घराच्या पाठीमागील खोलीत असणाऱ्या 3 तांब्याच्या घागरी ही चोरून नेल्या आहेत. गावाबाहेर चोरट्यानी वाहन थांबवून त्यामध्ये सर्व साहित्य घेऊन पोबारा केल्याचे केल्याचा संशय ग्रामस्थांना आहे. अशा घटना वाढू नये त्यासाठी चंदगड पोलिसांनी या भांडी चोरांच्या टोळीचा तातडीने छडा लावावा अशी मागणी होत आहे. 

        10 किलो वजनाचा एक तांब्याचा हंडा मोडीत घालायचा म्हटला तर 8 हजार रुपये किंमत होते. त्यामुळे या दोन गावातील 10 हंडे आणि 3 घागरी यांची किंमत सुमारे 1 लाख रुपये होते.

No comments:

Post a Comment