कोवाड- मुंबई ट्रॅव्हल्स ला अपघात...! तेऊरवाडीचा युवक जागीच ठार - चंदगड लाईव्ह न्युज

10 September 2024

कोवाड- मुंबई ट्रॅव्हल्स ला अपघात...! तेऊरवाडीचा युवक जागीच ठार

 

मयत सचिन विष्णू कुंभार

तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा

    सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना कोवाड ते मुंबई जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सला राष्ट्रीय महामार्गावरील बोगद्यात अपघात होऊन ड्रायव्हरच्या सीट नजीक बसलेला ट्रॅव्हल्स कामगार ठार झाला. ही घटना आज 10 सप्टेंबर 2024 रोजी पहाटे 4 च्या सुमारास पुणे- मुंबई दरम्यान घडली. सचिन विष्णू कुंभार (वय 26) असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव असून तो चंदगड तालुक्यातील तेऊरवाडी गावचा रहिवासी होता. या घटनेने तेऊरवाडी गावावर ऐन गणेशोत्सवात शोककळा पसरली आहे.

     आईवडीलांचे छत्र हरवलेला सचिन कुंभार हा कोवाडहून मुंबईला जाणाऱ्या परिवर्तन ट्रॅव्हल्सचा कर्मचारी होता. तेऊरवाडी गावातील अनेक लोक मुंबई येथे नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास असल्यामुळे गावातून त्यांचे साहित्य स्वतःच्या जबाबदारीवर त्यांना पोहोचवण्याचे काम तो प्रामाणिकपणे करायचा. अतिशय कष्टाने मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करणारा सचिन गावात कौतुकाचा विषय होता. त्याच्या जाण्यामुळे तेऊरवाडी गावावर अक्षरशः शोककळा पसरली आहे.

      राष्ट्रीय महामार्गावर परिवर्तन ट्रॅव्हल्स ला बोगद्यामध्ये अपघात झाला. या अपघातात ड्रॉयव्हरच्या शेजारी बसलेला सचिन गाडीची समोरची काच फुटून त्यातून बाहेर रस्त्यावर फेकला गेला. इतक्यात तो बसलेली ट्रॅव्हल्सच त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आधीच अनाथ असलेल्या सचिनचा अशाप्रकारे दूदैवी मृत्यू झाल्याने तेऊरवाडी ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे. 

No comments:

Post a Comment