चंदगड : सी एल वृतसेवा
कोणत्याही परिस्थितीत चंदगड विधानसभा निवडणूक लढवायचीच असा निर्धार ठाकरे शिवसेना पक्षाच्या शिवसैनिकांनी चंदगड येथील बैठकीत व्यक्त केला. पक्षाने या मतदारसंघातील जागा आपल्याकडे ठेवावी अशी मागणी बैठकीला उपस्थित पदाधिकाऱ्यांकडे शिवसैनिकांनी केली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगड येथे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, सहसंपर्कप्रमुख डॉ. रियाजभाई शमनजी, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, चंदगड विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू रेडेकर, प्रभाकर खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.
गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील जनतेचे विविध प्रश्न आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेनेने सोडवले आहेत. सर्वसामान्य, गोरगरीब जनतेच्या जिव्हाळ्यांच्या प्रश्नासाठी ठाकरे पक्ष शिवसेना रस्त्यावर उतरून सदैव जनतेच्या पाठीशी उभे राहिल्याने जनतेतून शिवसेनेला मोठी सहानुभूती आहे. त्यामुळे चंदगड विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकावा अशी इच्छा जनतेसह शिवसैनिकांची आहे. त्यामुळे मतदार संघातील जागा ही शिवसेनेलाच मिळाली पाहिजे अशी मागणी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू रेडेकर, आजरा तालुका प्रमुख युवराज पवार, गडहिंग्लज तालुकाप्रमुख दिलीप माने, अजित खोत, तालुका संघटक विक्रम मुतकेकर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांकडे केली.
या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले आहे. पक्ष प्रमुखांशी चर्चा करून लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी शिवसैनिकांना बैठकीत सांगितले.
सहसंपर्कप्रमुख डॉ. रियाजभाई शमनजी म्हणाले, शिवसैनिकांची मागणी ही रास्त आहे. गेल्या दोन निवडणुकांचा विचार करता या मतदारसंघात शिवसेनेला जनतेतून चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत निश्चितच यश मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीस कोल्हापूर जिल्हा युवा अधिकारी अवधूत पाटील, महिला जिल्हाप्रमुख शांता जाधव, शारदा घोरपडे, एकनाथ वाके यांच्यासह इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment