बांधकाम विभागामार्फत तिलारीनगर दोडामार्ग घाट रस्त्यात विवर सदृश्य पडलेले ते धोकादायक भगदाड काल मुजवले |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
तिलारीनगर दोडामार्ग घाटात मुख्य रस्त्यावर विवर सदृश्य भगदाड पडल्याचे शुक्रवारी काही वाहनधारकांच्या दृष्टीस पडले होते. यामुळे प्रवासी व वाहनधारकांत भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबतचे वृत्त सी एल न्यूज मधून प्रसिद्ध झाले होते त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगडचे अधिकारी इफ्तेकार मुल्ला व कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत हे भगदाड मुजवून वाहनधारकांना दिलासा दिला आहे.
कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यातून सिंधुदुर्ग व गोव्यात जाण्यासाठी सर्वात जवळचा म्हणून तिलारीनगर दोडामार्ग घाट ओळखला जातो. तीव्र उतार- चढावाची धोकादायक वळणे, वारंवार खचणारे रस्ते, कोसळणाऱ्या दरडी, नियमित अपघात ग्रस्त होऊन रस्त्यात पडणारी वाहने. अशा अनेक कारणांमुळे इथली वाहतूक वारंवार खंडित होते. त्यातच या विवराची भर पडली होती. याची बातमी वृत्तपत्रातून प्रसिद्ध होताच बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्त केला.
सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तिलारी घाट ३१ ऑक्टोबर अखेर वाहतुकीसाठी पूर्ण बंद केला असला तरी एसटी बस वगळता बंदी आदेश झुगारून सर्व प्रकारची अवजड वाहतूक सुरूच आहे. परिणामी केवळ एसटी वाहतुकीवर अवलंबून असलेले कामगार, विद्यार्थी, व्यापारी व प्रवासी यांची मोठी कुचंबना होत आहे. वेळ वाचवण्यासाठी येथून रोज ये जा करणारे विद्यार्थी, व्यापारी, रुग्ण व त्यांचे नातेवाईक व अनेक प्रवासी येथून जाणाऱ्या वाहन चालकांना दुप्पट तिप्पट पैसे देऊन प्रवास करत आहेत. याची दखल घेऊन घाटातील रस्त्याचा नादुरुस्त भाग तात्काळ दुरुस्त करावा. येथील एसटी बंद असल्यामुळे गणेशोत्सव काळात चाकरमाने व भागातील ग्रामस्थांचे प्रचंड हाल झाले हे पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी घटस्थापने पासून एसटी वाहतूक वाहतुकीस परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे.
दरम्यान घाटातील नादुरुस्त संरक्षक कठडे, रस्ता आदींच्या दुरुस्तीसाठी ८८.४५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवल्याचे तसेच निधी उपलब्ध होताच पावसाळ्यानंतर सर्व प्रकारची दुरुस्तीची कामे पूर्ण करणार असल्याचे अभियंता इफ्तेकार मुल्ला यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment