कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
शेतकरी कामगार परिवार व बांधकाम कामगार कल्याणकारी संघटना यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी संघटनेचे नेते नारायण रामू वाइंंगडे व त्यांचे सहकारी यांच्या गडहिंग्लज प्रांताधिकारी कार्यालयासमोर २६ सप्टेंबर पासून सुरू असलेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून गेल्या पाच दिवसात हजारो कामगार तसेच विविध पक्ष व संघटनांनी हजर राहून उपोषणास पाठिंबा दर्शवला आहे.
बांधकाम संबंधित कामगारांना रोजगार निर्मिती व्हावी, विद्यमान कल्याणकारी योजनांची कडक अंमलबजावणी व्हावी, कष्टाची कामे करणाऱ्या या कामगारांना ५६ व्या वर्षी निवृत्त करुन पेन्शन लागू करावी. शासकीय दवाखाने व कार्यालयांत स्वतंत्र कक्ष स्थापन करावेत. बोगस कामगारांना आळा घालण्यासाठी पडताळणी प्रक्रियेत संघटनेला स्थान मिळावे. बोगस कामगारांना शोधून त्यांना दिलेले लाभ दंडासहित वसूल करावे. बोगस नोंदणी करून देणारे एजंट, अधिकारी व राजकीय नेत्यांवर कठोर कारवाई करावी. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान गावोगावी राजकीय नेत्यांचे एजंट धनदांडग्यांना 'बांधकाम संबंधित कामगार' म्हणून प्रमाणपत्रांची खैरात वाटत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.
प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त बांधकाम कोल्हापूर यांनी संपर्क केला. तथापि सकारात्मक चर्चा न झाल्याने उपोषण सुरूच राहणार असल्याचे भाई वाईंगडे यांनी सांगितले. याकामी गडहिंग्लज व कोल्हापूर पोलीस, वैद्यकीय अधिकारी यांचे वेळोवेळी सहकार्य असल्याचे सांगितले. उपोषणकर्ते भाई नारायण वाईंगडे यांच्या सोबत मिस्त्री महादेव कदम, गड. तालुका प्रमुख मिस्त्री रमेश कलगुटगी, चंदगड तालुकाप्रमुख अवधूत भुजबळ, संपर्क प्रमुख रामचंद्र पाटील आदींची साथ लाभली आहे. आज सामजिक कार्यकर्ते अशोक पांडव (नेसरी), गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातून तुडये, ढेकोळी, सामाजिक कार्यकर्ते सुरेश वडराळे, पद्मिनी पिळणकर, महादेव शिंदे तसेच परिसरातील अनेक गावच्या बांधकाम कामगारांनी उपोषण स्थळी दिवसभर हजेरी लावून पाठिंबा व्यक्त केला.
No comments:
Post a Comment