भरमूआण्णा पाटील यांना विधान परिषदेची उमेदवारी द्यावी या मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री फडणवीस यांना देताना चंदगड भाजपचे कार्यकर्ते |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य पदी चंदगड विधानसभेचे माजी आमदार व माजी मंत्री भरमूआण्णा पाटील यांना उमेदवारी मिळावी, यासाठी भाजपच्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच मुंबई येथे भेट घेतली. या कामी फडणवीस यांनी अनुकूलता दाखवल्याचे समजते.
भाजप नेते व चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी या कामी पुढाकार घेतला. अनेक वाहने भरून भरमू अण्णा समर्थक व भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईत दाखल होत फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. भरमू अण्णांचे भाजपसाठी असलेले योगदान व युती शासन काळात त्यांनी केलेले कार्य याचा विचार करून राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी शिफारस करावी; असा आग्रह धरत निवेदन सादर केले. यावेळी फडणवीस यांनी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. भरमूआण्णा विधान परिषदेचे आमदार झाल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा चंदगड मतदार संघासह जिल्ह्यातील अन्य भाजप उमेदवारांना होऊ शकतो. दरम्यान कार्यकर्त्यांची भूमिका शांतपणे ऐकून मागणीला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अनुकूलता दर्शवल्याचे समजते. शिष्टमंडळात कार्यकर्त्यांसोबत माजी जिल्हा परिषद महिला बालकल्याण समिती सभापती ज्योती पाटील, पंचायत समिती सभापती शांताराम पाटील, जिप सदस्य सचिन बल्लाळ, अशोक कदम, गोकुळचे माजी संचालक दीपक पाटील, प्रताप सूर्यवंशी, आर जे पाटील, पंस. माजी उपसभापती बबन देसाई, राम पाटील, तुकाराम बेनके, जी एम पाटील, उदय कुमार देशपांडे, बाबूराव जाधव, नामदेव पाटील, आप्पा वांद्रे, नेवगे, विलास शेटजी आदींची उपस्थिती होती.
मुंबईतून परतल्यानंतर भाजप व भरमूआण्णांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावलेला दिसून आला. विधान परिषदेवर अण्णांची वर्णी लागणार! याचा फायदा शिवाजीराव पाटील यांना येत्या विधानसभा निवडणुकीत होणार अशी चर्चा रंगली आहे.
No comments:
Post a Comment