चंदगड : श्रीकांत पाटील /सी एल वृत्तसेवा
पत्रकारांची मातृसंस्था मराठी पत्रकार परिषद मुंबई अंतर्गत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या डिजिटल मीडिया परिषदेची पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा पिंपरी चिंचवड येथील प्र के अत्रे सभागृहात २० सप्टेंबर २०२४ रोजी उत्साहात पार पडली. कार्यशाळेस राज्यभरातील विविध न्यूज चॅनेलचे साडेतीनशे वर निमंत्रित पत्रकार उपस्थित होते. संस्थेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यशाळेत डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांची 'डिजिटल मीडिया परिषद' या नावाने स्वतंत्र शाखा सुरू करण्यात आली. या शाखेत निवड झालेल्या सात जणांच्या कार्यकारणीत कोल्हापूर जिल्ह्यातून चंदगड तालुक्याला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड येथे डिजिटल मीडियाच्या राज्यस्तरीय पहिल्या कार्यशाळेचे उद्घाटन करताना फोर पीएम चे संपादक संदीप शर्मा, सोबत एस. एम. देशमुख, असीम सरोदे आदी मान्यवर |
जाहीर करण्यात आलेल्या नव्या परिषदेचे राज्य अध्यक्ष म्हणून बीड जिल्ह्यातील पत्रकार अनिल वाघमारे यांची, कार्याध्यक्षपदी सातारा येथील माय मराठी 24 तास वाहिनीचे संपादक संतोष उर्फ सनी शिंदे यांची तर राज्य उपाध्यक्षपदी शेगाव जिल्हा बुलढाणा येथील पत्रकार अनिल उंबरकर यांची निवड करण्यात आली याशिवाय राज्य कार्यकारणी सदस्य पदी माथेरान येथील महाराष्ट्र न्यूज 24 तास चे संपादक मल्हार संतोष पवार, बीड येथील वास्तव अपडेट चे संपादक जितेंद्र शिरसाट व चंदगड येथील डीबीसी लाईव्ह न्यूज चे संपादक अनिल धुपदाळे व अहमदनगर येथील न्यूज टुडे 24 हे संपादक अल्ताफ शेख यांची नियुक्ती करण्यात आली एकूण 11 जणांच्या कार्यकारणीतील उर्वरित सदस्यांच्या निवडी लवकरच करण्यात येतील, डिजिटल मीडिया पूर्णपणे मराठी पत्रकार परिषदेच्या अंतर्गत काम करेल असे देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.
कार्यशाळेचे उद्घाटन लखनौ उत्तर प्रदेश येथील न्यूज 4 पीएम चे संपादक संजय शर्मा यांच्या हस्ते झाले. यावेळी सुप्रसिद्ध वकील व ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे, माहिती उपसंचालिका वर्षा पाटोळे, पुणे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, महा मॅक्स मुंबईचे संपादक रवींद्र आंबेकर, प्रा किशोर वायकर (प्रिन्सिपल ऑफ मास कम्युनिकेशन जर्नलिस्ट), संदीप चव्हाण (अध्यक्ष मुंबई मराठी पत्रकार संघ), बोल भिडू वृत्तवाहिनीचे संपादक चिन्मय साळवी, टीव्ही जर्नालिस्ट जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष उदय जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सर्व मान्यवरांनी पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ असून निकोप लोकशाही टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले.
न्यूज चॅनेल सुरु करण्यासाठी व ते टिकवण्यासाठी येणाऱ्या विविध अडचणी याबद्दलचे मार्गदर्शन करताना परिषदेच्या सभासद पत्रकारांमागे अडचणीच्या काळात ताकद उभे करण्याचे आश्वासन दिले. यावेळी राज्यभरातून आलेल्या सर्व पत्रकारांना भेट वस्तू देऊन निरोप देण्यात आला.
No comments:
Post a Comment