तांबे पितळेची भांडी संग्रहित छायाचित्र |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यात तांब्याचे हंडे व घागरी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. यात चोरांची टोळीच सक्रिय असण्याची शक्यता असून तालुक्यातील विविध गावात चोरटे 'हाथ की सफाई' दाखवताना दिसत आहेत. मागील सात आठ वर्षात वारंवार घडणाऱ्या या डकैतीने ग्रामस्थ चक्रावून गेले असून चंदगड पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनासमोर आव्हान उभे केले आहे.
चार दिवसांपूर्वी तालुक्यातील गंधर्वगड येथील तांब्याचे ८ हंडे व ३ घागरी तर वाळकूळी येथील घरासमोर ठेवलेले २ तांब्याचे हंडे चोरांनी लांबवले. गंधर्वगड येथे दोन घरांचे मागील दरवाजे कापून हंडे चोरून नेल्याने ग्रामस्थांत घबराट पसरली आहे. गंधर्वगड येथील नवल यादव यांच्या घराचा मागील दरवाजा कापून चोरट्याने खोलीत प्रवेश केल्याची चाहूल घरातील महिलांना लागली तथापि भीतीपोटी त्यांनी कोणतीच हालचाल केली नाही. चोरट्यांनी आरामात एक हंडा लांबवला. याशिवाय अनंत अमरुस्कर, हरिबा यादव, शिवाजी साळोखे, मष्णू अमरुस्कर, चाळोबा सरनोबत, सुरेश होडगे, चाळोबा सरनोबत आदींच्या घरातील हंडे व घागरी असा अंदाजे एक लाखापेक्षा अधिकचा माल पळवला. चोरट्यानी गावाबाहेर वाहन थांबवून त्यातून चोरीचा माल पळवल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
गंधर्वगड, वाळकुळी येथील घटना ताजी असतानाच काल दि. २२ रोजी रात्री दीडच्या सुमारास चंदगड तिलारीनगर मार्गावरील कळसगादे चार घरांतील हंडे व घागरी चोरट्यांनी लंपास केले. यात गणपत गुंडू सुतार (तांब्याचा हंडा व ३ घागरी), रवी विष्णू दळवी (४ घागर व ५ भांडी), शंकर धानू दळवी (हंडा, ३ घागरी व ८ भांडी), ठाणू गावडे (३ घागरी, २ भांडी) आदी साहित्यासह पोबारा केला. तिन्ही ठिकाणी चोरीच्या पद्धती समान असल्यामुळे चोरटे तेच असण्याची शक्यता आहे. तांब्याची मोड सध्या किलोला आठ ते नऊशे रुपये असून चोरट्यांनी पळवलेल्या भांड्यांची किंमत अंदाजे दोन लाखाच्या घरात जाते.
अशा वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी चंदगड पोलिसांनी भांडी चोरांच्या टोळीचा तातडीने छडा लावून त्यांना जेरबंद करावे. तर प्रत्येक गावात ग्रामपंचायतीमार्फत चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
1 comment:
He ghatna gavase gavat pn ghadli aahe 4 divasan purvi pn takrar kuni keleli nahi
Post a Comment