कोवाड शाळेत स्मार्ट टीव्ही च्या माध्यमातून शिकताना आनंदित झालेली मुले मुली, यावेळी वर्गशिक्षिका व देणगीदार प्रतिनिधी
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड (ता. चंदगड) शाळेस माजी विद्यार्थ्यांकडून चार एलईडी स्मार्ट टीव्ही देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आल्या. या स्मार्ट टीव्ही मुळे विद्यार्थ्यांना दृकश्राव्य स्वरूपात अध्यापन करताना सुलभता येणार आहे. या माध्यमातून घेतलेले ज्ञान विद्यार्थ्यांच्या चिरकाल स्मरणात राहते.
इयत्ता दहावी १९९५-९६ च्या बॅच कडून हे टीव्ही संच भेट देण्यात आले. कोवाड शाळेला यापूर्वी अशा प्रकारे सहकार्य करणारे माजी विद्यार्थी क्वचितच पाहायला मिळत होते. तथापि या बॅचच्या विद्यार्थ्यांनी मागे वळून पाहताना आपण ज्या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवले; तिथे शिकणाऱ्या नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना अध्ययन अध्यापनात सुलभता येण्यासाठी ही देणगी दिली. मुळातच जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध साधन सामग्री व सुविधांची वाणवा असते. ती भरून काढण्यासाठी शाळा इमारत, शाळेचा परिसर, क्रीडांगण, विद्यार्थ्यांच्या बौध्दिक क्षमता व सर्वांगीण प्रगतीसाठी अशा देणगीदारांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. केवळ शासनाच्या अनुदानावर विसंबून प्रगती साधता येणार नाही. त्यासाठी पालक, ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांनी या कामी पुढाकार घेणे आवश्यक आहे. कोवाड मध्ये ती सुरुवात या विद्यार्थ्यांनी केली ही कौतुकास्पद गोष्ट आहे.
या अनुकरणीय कार्यासाठी सागर शेट्टी, प्रमोद राजगोळकर, हंबीरराव सावंत, सचिन खोराटे, अझरुद्दीन मुल्ला, ज्ञानेश्वर भातकांडे, विनोद जाधव, दयानंद आडाव, सोमनाथ पाटील, नारायण खोराटे, अमोल राजगोळकर, राहुल रेडेकर आदी वर्ग मित्रांचे योगदान व सहकार्य लाभले. देणगी दिलेले दूरदर्शन संच मुख्याध्यापक सुरेश पाटील व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामा यादव यांनी स्वीकारले. यावेळी समिती उपाध्यक्षा सौ राजश्री सुर्वे, सर्व सदस्य व शिक्षक उपस्थित होते. स्वागत गणपती लोहार यांनी केले. श्रीकांत पाटील यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment