हडलगेत माजी सरपंचांचीआत्महत्या, पाच संशयितांवर गुन्हा दाखल, संतप्त नातेवाईकांचा मृतदेहासह नेसरी पोलीस स्टेशनला घेरावाने तणाव - चंदगड लाईव्ह न्युज

21 September 2024

हडलगेत माजी सरपंचांचीआत्महत्या, पाच संशयितांवर गुन्हा दाखल, संतप्त नातेवाईकांचा मृतदेहासह नेसरी पोलीस स्टेशनला घेरावाने तणाव


नेसरी पोलीस स्टेशन समोर नातेवाईकानी केलेली गर्दी

तेऊरवाडी /सी एल वृत्तसेवा
  गावातील पाच जणांनी सोशल मिडिया वरून आपली नाहक बदनामी केल्याच्या त्रासाला कंटाळून हडलगे (ता. गडहिंग्लज ) येथील माजी सरपंच व रेशन धान्य दुकान चालक विष्णू रामा पाटील (वय ६६) यांनी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने विषारी औषध प्राशन केले होते. शुक्रवारी उपचार चालू असताना विष्णू पाटील यांचा मृत्यू झाल्याने गावात एकच खळबळ उडाली. नातेवाईकांनी  संशयित पाच आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणी साठी मृतदेह थेट नेसरी पोलिस स्टेशनच्या दारात नेल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला.
विष्णू पाटील

   नेसरी पोलीस व घटना स्तळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, हडलगे गावातील सोशल मीडिया ग्रुपवर कृष्णा भावकू पाटील, शिवराज लक्ष्मण पाटील, ज्ञानदेव सुबराव पाटील, रघुनाथ जानबा पाटील, संजय विठ्ठल पाटील (सर्व रा. हडलगे) यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगून विष प्राशन केलेले हडलगेचे माजी सरपंच विष्णू रामा पाटील (वय ६६) यांचे शुक्रवार दि २०  सप्टेंबर रोजी सकाळी उपचारादरम्यान निधन झाले. या घटनेने गडहिग्लज व चंदगड तालुक्यात खळबळ उडाली असून या घटनेने हडलगेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पाच जणांच्या विरोधात नेसरी पोलिसात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 वरील संशयीत पाच जनांनी  गावातील  'भावेश्वरी ग्राम प्रतिष्ठान' या व्हॉट्सॲप ग्रुपवर संशयास्पद मॅसेज टाकला होता. या घटनेनंतर आपली बदनामी केल्याच्या भितीतून विष्णू पाटील यानी विषारी औषध प्राशन केले होते. त्यांच्यावर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्तेपूर्वी त्यांनी वरील पाच जण गावातील एका महिलेला व तीच्या मूलाला हाताशी धरून माझी नाहक बदनामी करत आहेत. या बदनामीला घाबरून मी आत्महत्या करत असून माझ्या मृत्यूला वरील पाच जणांना दोषी धरावे. असा व्हाटसॲप वर मॅसेज करून विषारी औषध प्राशन केले होते . येथील उपजिल्हा रुग्णालयातील उत्तरीय तपासणीनंतर त्यांच्या नातेवाइकांनी मृतदेह थेट नेसरी पोलिस ठाण्यासमोर नेला. या सर्व आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह हलविणार नाही, असा पवित्रा घेतल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. यानंतर प्रदीप विष्णू पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून  नेसरीचे सपोनि आबा गाढवे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.  या घटनेतील संशयीतांची नावे आठवड्यापूर्वीच व्हॉट्सॲप ग्रुपवर फिरली होती. या घटनेतील संशयीत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी  गोपाळराव पाटील, बाबूराव गुरबे, अमर चव्हाण, अनिल पाटील आदींनी डीवायएसपी रामदास इंगवले यांना विचारला. त्यांनी दोन दिवसांत संशयितांना ताब्यात घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी हडलगेला नेण्यात आला. विष्णू पाटील हे वारकरी संप्रदायाचे असल्याने टाळ मृदूंगाच्या घोषात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. गावात तणाव असल्याने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

No comments:

Post a Comment