तिलारीनगर दोडामार्ग घाट रस्त्यात विवर सदृश्य पडलेले धोकादायक भगदाड |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
तिलारीनगर दोडामार्ग घाट रस्त्यावर विवर सदृश्य भगदाड पडल्यामुळे घाटातून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. काल आढळलेल्या या विवरामुळे वाहनधारकांत घबराट पसरली असून सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांनी यावर तात्काळ उपाय योजना करावी अशी मागणी केली आहे.
कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यातून सिंधुदुर्ग व गोव्यात जाण्यासाठी सर्वात जवळचा म्हणून तिलारीनगर दोडामार्ग घाट ओळखला जातो. तीव्र उतार चढावाची धोकादायक वळणे, वारंवार खचणारे रस्ते, कोसळणाऱ्या दरडी, नियमित होणाऱ्या अपघातांमुळे रस्त्यात पडलेली अपघात ग्रस्त वाहने अशा अनेक कारणांमुळे इथली वाहतूक वारंवार खंडित होते. घाटातून मोठी वाहने नेण्यास पूर्वीपासूनच मनाई असली तरी सध्या गोव्यात जाण्यासाठी गुगल सर्च केल्यानंतर हाच रस्ता दिसत असल्याने येथून वाहने चालवण्याचा अनुभव नसलेले चालक या मृत्यूच्या जबड्यात प्रवेश करतात. परिणामी अनेक छोटी मोठी अवजड वाहने येथे अपघातग्रस्त होतात. असा अनुभव आहे.
यंदाच्या पहिल्याच पावसात जून महिन्यात सुमारे ९ किमी लांबीच्या या रस्त्याचा काही भाग खचल्यामुळे जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी ३१ ऑक्टोबर अखेर येथील वाहतूक पूर्ण बंद करण्याचे आदेश दिले असले तरी केवळ एसटी बस वगळता अवजड वाहनांसह सर्व प्रकारची वाहतूक बांधकाम व पोलीस खात्याला गुंगारा देत बिनदिक्कत गोव्यातून येजा करत आहेत. ३१ ऑक्टोबर नंतर येथून एसटी वाहतूक सुरू करण्यास परवानगी देणे अपेक्षित असले तरी बांधकाम विभागाकडून जून महिन्यात खचलेल्या रस्त्याच्या डागडुजीच्या कोणत्याही हालचाली दृष्टीपथात नाहीत. केवळ एसटी वाहतुकीवर अवलंबून असलेले कामगार, विद्यार्थी, व्यापारी व प्रवासी यांची मोठी कुचंबना होत आहे. एसटी पेक्षा दुप्पट तिप्पट अवजड वाहने घाटातून जात असताना एसटी वाहतूकच का? बंद असा सवाल करत लवकरात लवकर एसटी सुरू करावी. खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेऊन पूर्ण करावे. तसेच काल 'शोध लागलेले' हे विवर सदृश्य भगदाड मुजवून संभाव्य मोठे अपघात टाळावेत अशी मागणी प्रवासी व वाहनधारकांतून होत आहे.
No comments:
Post a Comment