गितेश कृष्णा वर्गे |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
बेळगाव, होसूर ते कोवाड मार्गावरील होसूर ते कल्याणपूर फाटा दरम्यान असलेल्या ओढ्यानजिक झालेल्या दुचाकी अपघातात एक जण ठार झाला. ही घटना काल दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. गितेश कृष्णा वर्गे, वय ३३, राहणार बुक्कीहाळ बुद्रुक, ता चंदगड असे अपघातातील मयत तरुणाचे नाव आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी मयत गितेश हा बेळगाव मधील एका फायनान्स कंपनीत नोकरी करत होता. ड्युटी संपवून तो रात्री बेळगाव कडून आपल्या गावी येण्यासाठी निघाला होता. तथापि होसूर गावाकडील बाजूच्या तीव्र उतार व वळणावर त्याचा दुचाकी वरील ताबा सुटून तो वाहनासह अपघात ग्रस्त झाला. यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. याचवेळी रात्री निट्टूर कडे जाणाऱ्या वाहनातील लोकांना या अपघाताची माहिती पोलिसांना दिल्याचे समजते. यानंतर चंदगड पोलिसांनी अपघात स्थळी येऊन वाहन व मृतदेह ताब्यात घेतला. चंदगड ग्रामीण रुग्णालय येथे मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मयत गितेश याच्या पश्चात पत्नी, तीन वर्षांची मुलगी, आई वडील, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ होत आहे.
आजच तेऊरवाडी येथील तरुणाचा मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स खाली सापडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर दोन दिवसांपूर्वीच तिलारी धरण जलाशयात बुडून बेळगाव येथील आर्मी सेंटरचे दोन जवान सराव करताना बुडून मयत झाले होते. चंदगड तालुक्यात सलग घडणाऱ्या घटनांमुळे ऐन गणेशोत्सव काळात शोकाकूल वातावरण पसरले आहे.
No comments:
Post a Comment